Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Sangli › संतप्त शेतकर्‍यांनी कांद्याचे सौदे बंद पाडले

संतप्त शेतकर्‍यांनी कांद्याचे सौदे बंद पाडले

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 8:50PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी कांद्याचे दर पडल्याने शेतकरी संतप्त झाले. शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडले. फळे व भाजीपाला मार्केटच्या तेवीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडण्याचा प्रकार घडला. आवक दीडपटीहूून अधिक झाल्याने तीनशे ते पाचशे रुपयांनी दरात घसरण झाली. दरम्यान, बेकायदा 2 टक्के अडत कपातीचा प्रकारही समोर आला. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी तातडीने  फळे व भाजीपाला मार्केटला भेट देऊन  शेतकरी, अडत्यांची बैठक घेतली व सौदा पूर्ववत सुरू झाला. 

फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी सकाळी कांद्याचे सौदे सुरू झाले. क्विंटलला 1700 ते 1900 रुपये दर होता. मात्र शनिवारी या मार्केटमध्ये 2200 रुपयांपर्यंत दर होता. तीनशे ते पाचशे रुपयांनी दर कमी असल्याने शेतकरी संतप्त झाले. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 60 ते 70 शेतकर्‍यांनी संतप्त होत कांद्याचा सौदा बंद पाडला. बहुसंख्य शेतकरी अहमदनगर, सातारा जिल्ह्यातील आहेत. 

सभापती दिनकर पाटील हे इस्लामपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला चालले होते. मात्र  शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडल्याचे समजताच त्यांनी इस्लामपूर दौरा रद्द करून फळे व भाजीपाला मार्केट गाठले. संचालक जीवन पाटील, दादासाहेब कोळेकर, सचिव पी. एस. पाटील, सहायक सचिव रार्जे-शिर्के उपस्थित होते. पाटील यांनी शेतकरी व अडते यांच्याशी चर्चा केली. 

‘व्यापार्‍यांशी दूरध्वीवरून दराची माहिती घेऊन कांदा विक्रीसाठी आणला आहे. इथे आल्यानंतर मात्र दर पाडला आहे’, अशी तक्रार अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केली.  आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. राज्यात अन्य बाजारपेठेतही दर कमी असल्याचे अडते व व खरेदीदार व्यापार्‍यांनी सांगितले. 

कांद्याला जास्तीत- जास्त दर देण्यासंदर्भात सभापती पाटील यांनी अडते, खरेदीदार व्यापार्‍यांना सांगितले. ते म्हणाले, अपेक्षित दर नसेल तर बाजार समितीमार्फत कांद्याची विनाशुल्क साठवणूक केली जाईल.  शेतकर्‍यांची निवासाची सोय केली जाईल.  दरम्यान सभापती पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सौदे सुरू झाले. मात्र  कमाल सतराशे ते एकोणीसशे रुपये दर राहिला. 

बेकायदा कपात परत केली

शेतकर्‍यांच्या बिल पट्टीतून अडत कपात करता येत नाही. मात्र पट्टीच्या पाठीमागील बाजूस पेन्सिलने 2 टक्के अडत वजावट केली जाते. तीन शेतकर्‍यांनी   तक्रार केल्यानंतर त्यांना कपात केलेले 3 हजार रुपये अडत्याने परत केले. बेकायदेशीरपणे अडत कपात केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असे बाजार समितीतर्फे सुनावण्यात आले.