होमपेज › Sangli › नाराजांचा काँग्रेस आघाडीला फटका

नाराजांचा काँग्रेस आघाडीला फटका

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 9:03PMसांगली : अभिजित बसुगडे

महापालिकेच्या सांगलीतील प्रभाग 10 आणि 18 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील नाराजांचाच त्यांना फटका बसल्याचे दिसून आले. आघाडीने उमेदवारी डावलल्याने काहींनी बंडखोरी केली तर काहींनी थेट भाजपलाच उघडपणे सहकार्य केले. आघाडीतील बंडखोरांमुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असणार्‍या या प्रभागात भाजप प्लसमध्ये गेल्याचे दिसून आले. 

प्रभाग क्रमांक दहामध्ये आघाडीने उत्तम कांबळे, गीता पवार, वर्षा निंबाळकर, प्रकाश मुळके यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या नगरसेविका अनारकली कुरणे यांना आघाडीने उमेदवारी डावलल्यानंतर त्यांनी भाजपमधून उमेदवारी जाहीर केली. त्यातच काँग्रेसच्या शेवंता वाघमारे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आघाडीच्या गीता पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले तरअनुसूचित जाती गटात अपक्ष उमेदवार अशोक मासाळे यांनी चांगली लढत दिल्याने उत्तम कांबळे दीड हजारांच्या फरकाने पराभूत झाले. या गटात जगन्नाथ ठोकळेंनी बाजी मारली. 

ओबीसी महिला गटात वडर समाजाचे गठ्ठा मतदान आणि अमर निंबाळकर यांच्या जनसंपर्कावर आघाडीच्या वर्षा निंबाळकर विजयी झाल्या. तर खुल्या गटातून प्रकाश मुळके विजयी झाले. मुळके यांनी भाजपचे तगडे उमेदवार मुन्ना कुरणे यांचा पाचशे मतांनी पराभव केला. इथल्या मतदारांनी कुरणेंच्या घरातील केवळ एकाच व्यक्तीला स्वीकारल्याचे दिसून आले. 

प्रभाग क्रमांक 18 मध्येही नाराजांचा आघाडीला जोरदार फटका बसल्याचे दिसून आले. ऐनवेळी छाननीत अर्ज बाद झाल्याने आघाडीच्या ज्योती आदाटे यांना अपक्ष म्हणून लढावे लागले. त्यांना आघाडीने पुरस्कृत केले होते. मात्र या गटात सुरुवातीपासूनच स्नेहल सावंत यांचे पारडे जड होते. त्यात आदाटेंना आघाडीचे चिन्ह न मिळाल्याचा फटका बसला. ओबीसी महिला गटात आघाडीने बिसमिल्ला शेख या नवख्या महिलेला उमेदवारी दिली होती. त्याचीही नाराजी होती. 

आमदार गाडगीळ यांचे खंदे समर्थक असलेल्या नसीमा नाईक यांनी शामरावनगरमध्ये गाडगीळ यांनी केलेल्या विकासकामांच्या ताकदीवर  विजयश्री खेचून आणली. मात्र खुल्या प्रवर्गात भाजपने उमेदवारीचा घोळ घातल्याने या गटात काँग्रेसचे अभिजित भोसले मताधिक्क्याने विजयी झाले. तर खुल्या गटात महेंद्र सावंत आणि नगरसेवक राजू गवळी या दोघांमध्ये काट्याची टक्कर झाली. राष्ट्रवादीचे नाराज संदीप दळवी यांनी उघडपणे भाजपला मदत केली. यामुळे सावंत यांना निसटता विजय मिळाला.