Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Sangli › फसविणार्‍या सरकारला धडा शिकवू 

फसविणार्‍या सरकारला धडा शिकवू 

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 8:41PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

मानधनवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू न झाल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. शासनाचा निषेध केला. मानधनवाढीच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी सुरू न केल्यास राज्यात पुन्हा बेमुदत संप सुरू होईल. फसविणार्‍या सरकारला धडा शिकवला जाईल, असा इशारा दिला. 

अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश संघटक बिराज साळुंखे, अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा व निदर्शने केली. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्षा ललिता चौगुले, कांचन कोळी, सुनंदा मिरजकर, रेखा पाटील, अंजली चट्टेकरी, पुष्पा पाटील, सुलोचना चौगुले, हौसाक्का चौधरी, अनिता कोरडे, अर्चना पाटील, दीपा कुलकर्णी, आरती हेगडे, निर्मला पाटील, सविता चौगुले व सेविका, मदतनीस यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

साळुंखे म्हणाले, राज्यात दि. 11 सप्टेंबर ते दि. 6 ऑक्टोबर या कालावधीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर 26 दिवसांचा संप मागे घेण्यात आला. सेवाज्येष्ठतेनुसार सुधारित मानधनवाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. मात्र,  अद्याप या घोषणेचा आदेश निघालेला नाही. सेविका, मदतनीस वाढीव मानधनापासून वंचित आहेत. मानधनवाढीचा शासन आदेश न निघाल्यास राज्यात पुन्हा सेविका, मदतनीस यांचा बेमुदत संप सुरू होईल. 

मुख्यमंत्र्यांनी फसवले : अ‍ॅड. शिंदे

अ‍ॅड. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मानधनवाढीची घोषणा केल्याने राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संप मागे घेतला. अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली आहे. शासन जर सनदशीर मार्गाने वठणीवर येणार नसेल तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गाने वठणीवर आणले जाईल.  

परभणीत सेविकेची आत्महत्या

पीएफएमएस प्रणालीमुळे  अंगणवाडी कर्मचार्‍यांना जूनपासून मानधन मिळाले नसल्याकडेही अंगणवाडी कर्मचारी सभेने लक्ष वेधले. परभणीत एका अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केली आहे.