Fri, Jul 19, 2019 07:37होमपेज › Sangli › जिल्ह्यात ३४७ अंगणवाडी सेविकांची नोकरी गेली

जिल्ह्यात ३४७ अंगणवाडी सेविकांची नोकरी गेली

Published On: Mar 06 2018 8:52PM | Last Updated: Mar 06 2018 8:47PMसांगली : प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे सेवासमाप्तीचे वय 65 वरून 60 वर्षे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 347 सेविका व मदतनीस यांची सेवा दि. 31 मार्च 2018 रोजी समाप्त होत आहे. शासनाने मानधन वाढविले, पण सेवासमाप्तीचे वय पाच वर्षांनी कमी केल्याने नोकरी गेली, असा प्रकार घडला आहे. सेवासमाप्तीचे वय कमी केल्याचा फटका बसलेल्या सेविका, मदतनीस यांना दिलासा म्हणून शासनाने एकरकमी ठराविक आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. 

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मानधनवाढीसाठी राज्यव्यापी संप केला होता.  दि. 11 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2017  या कालावधीत सेविका, मदतनीस संपावर होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानधनवाढीची घोषणा केल्याने आंदोलन थांबविण्यात आले. मात्र मानधनवाढीचा प्रत्यक्ष शासन आदेश निघण्यास दि. 23 फेब्रुवारी 2018 हा दिवस उजाडला. मानधनवाढ झाली. मात्र सेविका, मदतनीस, मिनी सेविका यांचे सेवासमाप्तीचे वय दि. 1 एप्रिल 2018 पासून  65 वर्षावरून 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात 214 अंगणवाडी सेविका आणि 133 मदतनीस यांचे वय दि. 31 मार्च 2018 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांची सेवा दि. 31 मार्च रोजी संपणार आहे. या 347 अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याबाबत मानधनवाढीचा आनंद तात्पुरता ठरला आहे. सेवासमाप्तीचे वय 5 वर्षांनी कमी केल्याने त्यांना महिनाअखेरीस नोकरीस मुकावे लागणार आहे. त्यांची मानधनी सेवा समाप्त होणार आहे.