Sat, Mar 23, 2019 18:33



होमपेज › Sangli › अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद; निदर्शने

अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद; निदर्शने

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 9:25PM



सांगली : प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना दरमहा किमान 10 हजार रुपये मानधन मिळावे, सेवासमाप्तीचे लाभ तिप्पट करावेत, वारसदारांना अनुकंपा तत्वावर नेमणूक द्यावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे मंगळवारी जिल्हा परिषदेजवळ थाळीनाद आंदोलन केले. शासनाच्या विरोधात घोषणा देत जोरदार निदर्शनेही केली. 
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. स्नेहलता कोरे, आनंदी भोसले, नादिरा नदाफ, राजू लोखंडे, विजय जाधव, अरूणा झगडे, अलका माने, मधुमती मोरे, अलका विभुते, वंदना सकळे, शुभांगी कांबळे, माधुरी जोशी, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मथुरा कांबळे तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

मंगला सराफ म्हणाल्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वेतन व भत्ते लागू करावेत,  अंगणवाडी सेविकांना दरमहा किमान 10 हजार रुपये व सेविकांना 7 हजार 500 रुपये मानधन मिळावे, मानधन दरमहा एक तारखेला मिळावे, मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रुपांतर करावे, सेवासमाप्तीनंतर सेविकेला 1 लाख व मदतनीसला 75 हजार रुपये लाभ मिळतो; तो  तिप्पट करावा, सेवेतील सेविका अथवा मदतनीसचा मृत्यू झाल्यानंतर वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर सेविका अथवा मदतनीस म्हणून नियुक्त करावे यासह एकूण अठरा मागण्या आहेत. या मागण्यांसाठी लढा तीव्र केला जाणार आहे. 

26 सप्टेंबरला मुंबईत मोर्चा

सराफ म्हणाल्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष  वेधण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या 6 संघटनांच्या कृती समितीमार्फत दि. 26 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास जानेवारीत लढा तीव्र केला जाईल. 

लढा डोनेशन, वर्गणी घेतोय

सराफ म्हणाल्या, संघटनेच्या लढ्यामुळे सेविकांना दरमहा 2 हजार रुपये व मदतनीस यांना 1 हजार 400 रुपये मानधन वाढ झाली आहे. मागण्यांसाठी लढा यापुढेही चालूच राहणार आहे. त्यामुळे संघटनेसाठी ‘लढा डोनेशन’ म्हणून प्रती अंगणवाडी 1800 रूपये घेण्यात येणार आहे. सेविकेकडून 1 हजार रुपये व वार्षिक वर्गणी 200 रुपये, मदतनीसकडून 600 रुपये व मिनी अंगणवाडी सेविकेकडून 900 रुपये याप्रमाणे रक्कम घेत आहोत. राज्य संघटनेच्या सही, शिक्क्याची पावतीही देत आहोत. यात गैर काहीही केले जात नाही. 

संघटना अधिकृत; नावानिशी आरोप करून दाखवा

सेविका, मदतनीस यांना मानधनवाढीबद्दल एक अनधिकृत संघटना प्रत्येक अंगणवाडीकडून 2 हजार रुपये प्रमाणे वसुली करत असल्याचा आरोप पूर्व प्राथमिक अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष शाकिरा सय्यद यांनी केला होता. त्या आरोपाचा समाचार घेताना मंगला सराफ म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ही अधिकृत संघटना आहे. शाकिरा सय्यद यांनी संघटना व वसुलीबाबत संघटनेच्या नावानिशी आरोप करून दाखवावेत. आमच्या संघटनेचे नाव घेतले असते तर सय्यद यांच्यावर न्यायालयात दावा दाखल केला असता.