होमपेज › Sangli › रामलिंग बेटावरील मारूती मंदिर प्राचीन 

रामलिंग बेटावरील मारूती मंदिर प्राचीन 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : मारूती पाटील 

वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेटावर समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या 11 मारूतींपैकी एक मारूती मंदीर आहे.अकरा मारूतीपैकी ही मूर्ती सर्वांत भव्य आहे.त्यामुळे या बेटाला प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते.

इस्लामपूर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर कृष्णेच्या पात्रात हे ठिकाण वसलेले आहे. प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती असे म्हणतात.रामलिंग बेट हे गावाच्या पश्‍चिमेला कृष्णानदीच्या पात्रात सुमारे  1 किलोमीटर लांब व अर्धा किलोमीटर रुंद असलेल्या खडकावर  तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचे वरदान  या ठिकाणाला लाभलेले आहे. रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. मध्ययुगीन काळात रचल्या गेलेल्या एक-दोन पुराणांतही  या मंदिराचे अनेक दाखले मिळतात.
 
एक आख्यायिका अशी 

रावणाचा वध  करून अयोध्येला परत जाताना प्रभुरामचंद्र कृष्णा नदीच्या काठी असलेल्या बोरगाव येथे थांबले होते.तिथे कृष्णेच्या वाळवंटात स्नान करायला गेले. त्यावेळी त्यांना पाहून कृष्णा नदी उचंबळून आली आणि तिला अकस्मात पूर आला.मारूतीने नदीपात्रात मधोमध बसून दोन बाहू आडवे धरून तो प्रवाह आपल्या दोन्ही बाजूंनी प्रवाहित केला.एक बेट तयार झाले.तेच हे रामलिंग बेट.

आणखी एक आख्यायिका अशी 

या ठिकाणी मारूतीचे दर्शन घडेल अशा अपेक्षेने समर्थ रामदास  आले होते. मारूतीने त्यांना मूर्तीरूपात दर्शन दिले नाही.त्यामुळे समर्थांनी मारूतीचा धावा सुरू केला.त्यांना त्यावेळी पाठीमागून डोहातून हाका ऐकू आल्या. समर्थांनी डोहात उडी मारून तेथून मारूतीची ही मूर्ती बाहेर काढली आणि तिची स्थापना या ठिकाणी केली.ही गोष्ट इ.स.1652 मधील आहे.त्यामुळेच  या मूर्तीचे दोन्ही हात दोन्ही मांड्यांच्या बाजूला पाणी अडविण्याच्या पवित्र्यात दिसतात.राममंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मंदिरात ही मूर्ती आहे. हे मंदीर पूर्वाभिमुख आहे.

पर्यटनस्थळाचा दर्जा

या दोन्ही मंदिरांमुळे क्षेत्राला विशेष महत्व  आहे.या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आलेले नाही असा इतिहास आहे. आमदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. मंजूर निधीतून मंदिर परिसराला तटबंदी बांधली आहे.अंतर्गत रस्ते, निवासस्थान, बाग-बगीचे, मुख्य दरवाजा, नदीपात्रातील रस्ता आदि कामे मार्गी लागली आहेत.वर्षभर या ठिकाणी दर्शनसाठी राज्यभरातून भाविकांची गर्दी होत असते. 

Tags : Sangli, sangli News, Ancient, Maruti Temple, Ramalinga, Island


  •