Fri, May 24, 2019 06:30होमपेज › Sangli › भयग्रस्त करणारी भानामती अंनिसने थांबविली

भयग्रस्त करणारी भानामती अंनिसने थांबविली

Published On: Apr 18 2018 12:53AM | Last Updated: Apr 17 2018 10:39PMसांगली : प्रतिनिधी

करणी-भानामतीच्या नावाने भयग्रस्त झालेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील एका कुटुंबाला संकटमुक्त करण्यात अंनिसच्या सांगली शाखेला यश मिळाले. यामुळे करणी, भानामती ही अंधश्रध्दा असल्याचेही उघड झाले. 

तालुक्यातील एका गावात एका कुटुंबावर  अचानक एकामागून एक संकटे कोसळू लागली. त्यामुळे त्रस्त झालेल्या कुटुंब प्रमुखाने नृसिंहवाडी गाठली. तेथील एकाने त्याच्याकडून त्रिपिंडी पूजा करवून घेतली. त्यासाठी तीन हजार रुपये दक्षिणा घेऊन त्याने  ‘आता संकट टळेल’, असे सांगितले. पण संकटे टळली तर नाहीतच; उलट वस्तीवर गूढ प्रकार सुरू झाले. 

एके दिवशी दोन शेळ्या अचानक मरण पावल्या. थोड्याच दिवसात दोन जर्सी गाईंचा अचानक मृत्यू झाला. या प्रकाराने कुटुंबीय भयभीत झाले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. तर शेतामधील मिरच्या व वांग्यांची रोपे अचानक आडवी होऊ लागली. हा सगळा करणी-भानामतीचाच प्रकार असावा, अशी त्या कुटुंबाची खात्रीच झाली. पण  त्या कुटुंबातील एकजण याबद्दल साशंक होता. त्याने सांगली अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे यांच्याशी संपर्क साधला आणि या गूढ प्रकाराचा तपास करण्याची त्यांना विनंती केली.

प्रा.आर्डे, डॉ. संजय निटवे, आशा धनाले आणि त्रिशला शहा यांनी लगेच त्या गावातील वस्ती गाठली. त्यांनी अंनिसच्या पद्धतीने या प्रकाराचा शोध घेण्यास सुरुवात झाली. संबंधित कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मुलाखती  घेतल्या. कारण अशा प्रकारामागे कुटुंबातील तणावग्रस्त मनोविकृत व्यक्ती असते  हे ध्यानात घेऊनच शोध घ्यावा लागतो. त्या  कुटुंबातील प्रत्येक सदस्याची  मुलाखत घेतल्यावर या गूढ प्रकारामागे कोण व्यक्ती असावी, हे अंनिस टीमच्या लक्षात आले. 

पुढचा टप्पा म्हणून पदाधिकार्‍यांनी शेतात उपटून टाकलेली वांग्याची व मिरचीची रोपे घेतली. सर्व कुटुंबियांना एकत्र बोलावले. ‘या रोपांवरील हाताचे ठसे तज्ज्ञांकडून आम्ही घेणार आहोत. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव उघड करणार आहोत’ असा इशारा दिला. ‘तुमच्यापैकी कोणी हा प्रकार करीत असेल तर तो थांबवा’, असे सांगितले. 

कोणतीही अद‍ृश्य शक्ती झाडाची रोपे उपटत नसते, तर मानवी हाताची ही करामत असते, असेही त्या कुटुंबियांना या टीमने सांगितले. या तंत्राने चोख कामगिरी बजावली आणि दुसर्‍याच दिवसापासून शेतातील रोपे उपटणारी भानामती बंद झाली. शिल्लक गायींना देखील कसलीही दुखापत झाली नाही. दहा दिवसांनी आर्डे व डॉ. संजय निटवे यांनी पुन्हा त्या कुटुंब प्रमुखांची भेट घेतली. त्यांच्या चेहर्‍यावर संकटमुक्त झाल्याची भावना होती. 


Tags : Anabolistic ,Bhanamati Anis ,sangli news