होमपेज › Sangli › आजी-माजी महापौरांसह 40 जण मैदानात

आजी-माजी महापौरांसह 40 जण मैदानात

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:45PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी गेल्या आठवड्याभरापासून उमेदवारी अर्ज दाखल होत होते.परंतु बुधवारी शेवटच्या दिवशी एबी फॉर्मद्वारे कोणाला उमेदवारी मिळाली आणि कोणाला नारळ मिळाला हे स्पष्ट झाले. यामध्ये विविध पक्षातील 78 पैकी आजी-माजी महापौरांसह तब्बल 40 जणांना पुन्हा उमेदवारीची लॉटरी लागली. मात्र 40 जणांचा पत्ता कापला गेला.यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक, माजी उपहापौर प्रशांत मजलेकर, प्रशांत पाटील, सुरेश आवटी, बाळासाहेब काकडे आदींचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी असे पक्ष महापालिकेत होते. सत्ताधारी काँग्रेसचे 43, राष्ट्रवादीचे 24 तर स्वाभिमानी आघाडीचे 11 नगरसेवक होते. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, डावी आघाडी हे नव्याने पक्ष निवडणुकीच्या मैदानात

स्वतंत्रपणे उतरले आहेत. 

काँग्रेसच्या आठ ते दहा नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 31 वर आले आहे. शिवाय यामध्येही गटबाजीने काहीजणांनी वेगवेगळ्या वाटा धरल्या होत्या. त्यामुळे यातील काही जणांच्या उमेदवारीला डच्चू देण्याची भूमिका घेतली होती. 

दुसरीकडे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीमुळे काही निष्ठावंतांच्या उमेदवारीवरही गंडांतर येण्याची वेळ आली होती. यातूनच काँग्रेसमधील 43 पैकी  केवळ 13 नगरसेवकांनाच काँग्रेसतर्फे पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले. उर्वरित 20 पेक्षा अधिकजणांचा पत्ता कापण्यात आला. राष्ट्रवादीतूनही 24 पैकी 15 जणांना उमेदवारी देण्यात आली. उर्वरित 9 पैकी सौ. स्नेहल सावंत, महेंद्र सावंत यांनी भाजपची वाट धरली. वास्तविक सावंत गट मंगळवारपर्यंत राष्ट्रवादीत होता. बुधवारी अर्ज दाखल करताना मात्र ऐनवेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत त्यांनी उडी मारली.काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, मनसेच्या शांता जाधव, जनता दलाच्या संगीता खोत, रिपाइंचे जगन्नाथ ठोकळे, विवेक कांबळे, अपक्ष धीरज सूर्यवंशी, भाजपचे युवराज बावडेकर, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत यांना भाजपने उमेदवारी दिली. 

महापौर इन, नाईक आऊट

महापौर हारूण शिकलगार यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये खल रंगला होता. त्यांना थांबवून त्यांच्या घरातील उमेदवार देण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला होता. त्यामुळे शिकलगार अत्यंत नाराज झाले होते. काँग्रेसने स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक यांना अर्ज भरण्यासही सांगितले होते. पण बुधवारी शिकलगार की नाईक, यावर पुन्हा चर्चा झाली. अखेर काँग्रेसने महापौर शिकलगार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि  राजेश नाईक यांना थांबविले. नाईक यांना घरातील महिला उमेदवार देण्याची सूचना करण्यात आली होती. पण त्यांनी ती फेटाळून लावली. अखेर नाईक यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द नेत्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.महापौरांच्या उमेदवारी अर्जावर तांत्रिक कारणाने आक्षेप येऊ शकतो, हे लक्षात घेऊन काँग्रेसने त्यांचे चिरंजीव इरफान यांनाही अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यांच्या एबी फॉर्मवर दोघांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हारुण शिकलगार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाले.

यांना पुन्हा संधी मिळाली

काँग्रेस - महापौर  शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते, दिलीप पाटील, पुष्पलता पाटील, माजी स्थायी सभापती  संजय मेंढे, बबिता मेंढे, रोहिणी पाटील, संतोष पाटील, धोंडूबाई कलकुटगी, माजी महापौर कांचन कांबळे, उमेश पाटील, मृणाल पाटील.राष्ट्रवादी : धनपाल खोत, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी महापौर इद्रिस नायकवडी, मालन हुलवान, (काँग्रेसमधून उडी) विष्णु माने, स्नेहा औंधकर, मनगू सरगर, दिग्विजय सूर्यवंशी, राजू गवळी, कांचन भंडारे, प्रियंका बंडगर, युवराज गायकवाड, संगीता हारगे.स्वाभीमानी :  शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळे, विजय घाडगे (काँगे्रेसमधून उडी) सौ. आशा शिंदे (राष्ट्रवादीतून उडी), अश्‍विनी खंडागळे.

नातेवाईक-पै पाहुण्यांनाच संधी

काग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या उमेदवार यादीत माजी नगरसेवक, तसेच नातलगांचा मोठा भरणा आहे. काँग्रेसने नगरसेवक प्रशांत पाटील यांच्या पत्नी पद्मश्री यांना उमेदवारी दिली आहे. वहिदा नायकवडी, अजित दोरकर, मदिना बारुदवाले, अजित सूर्यवंशी, प्रमोद सूर्यवंशी या माजी नगरसेवकांनाही उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने माजी नगरसेवक हरिदास पाटील यांना संधी दिली आहे. भाजपने मुन्ना कुरणे, आनंदा देवमाने, पांडुरंग कोरे, बाळाराम जाधव, विजय हाबळे, लक्ष्मण नवलाई, जयश्री कुरणे या माजी नगरसेवकांना संधी दिली आहे.  खासदार संजय पाटील यांचे  नातलग रणजितसिंह पाटील, सोनल विक्रमसिंह पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या पत्नी स्वाती यांनाही उमेदवारी दिली आहे.

यांचा पत्ता झाला कट

काँग्रेस - उपमहापौर विजय घाडगे, प्रशांत मजलेकर, प्रशांत पाटील, किशोर लाटणे, निर्मला जगदाळे, सुरेखा कांबळे, शेवंता वाघमारे, अश्विनी कांबळे, बाळासाहेब काकडे, पांडुरंग भिसे, अनारकली कुरणे, शकुंतला भोसले, अलका पवार, अश्‍विनी कांबळे, सुरेश आवटी, गुलजार पेंढारी, प्रशांत मजलेकर, निर्मला जगदाळे, सौ. शकुंतला भोसले, शालन चव्हाण, सौ. सुनीता खोत, अनारकली कुरणे (ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी), प्रदीप पाटील, सुनीता पाटील, नाजीया नायकवडी, आयुब पठाण, शेवंता वाघमारे, बेबी मालगावे.राष्ट्रवादी : सौ. अंजना कुंडले, अल्लाउद्दीन काझी, सौ. शुभांगी देवमाने, स्वाभीमानी :  स्वरदा केळकर.