Wed, Apr 24, 2019 22:13होमपेज › Sangli › पोलिस ठाण्यातील सर्वांची चौकशी होणार

पोलिस ठाण्यातील सर्वांची चौकशी होणार

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:33PM

बुकमार्क करा

मिरज : प्रतिनिधी

महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात अल्लाउद्दीन बाबालाल बगारे (वय 30) या तरुणास दोघा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे. त्याप्रकरणी त्या दोन पोलिसांसह पोलिस ठाण्यात हजर असलेल्या इतर पोलिसांचीही चौकशी करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.  चौकशी अहवाल येत्या तीन दिवसात पोलिस अधीक्षकांना सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मटका प्रकरणी बुधवारी (दि. 6 डिसेंबर) रोजी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडील पोलिसांनी कारवाई केली.  पोलिस ठाण्यात नेल्यानंतर पोलिस बाळासाहेब निळे व साईनाथ ठाकूर यांनी मारहाण केली असल्याची तक्रार बगारे यांच्या पत्नी मर्जिना यांनी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने मारहाण प्रकरणाची पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्याकडून चौकशी सुरू आहे.
तक्रार करण्यात आलेल्या हवालदार बाळासाहेब निळे व साईनाथ ठाकूर या दोघा पोलिसांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच पोलिस ठाण्यामध्ये मारहाणीचा प्रकार घडला त्या दिवशी हजर असलेल्या इतर पोलिसांचेही जबाब नोंदविले जाणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावेही तपासले जाणार असून या संदर्भातील अहवाल येत्या मंगळवारी पोलिस अधीक्षकांना सादर केला जाईल असे  पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, अल्लाउद्दीन बगारे यास पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणप्रकरणी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर प्राथमिक उपचार करुन त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर लगेच बगारे याची प्रकृती बिघडल्याने त्यास पुन्हा अतिदक्षता विभागात दाखल करुन घेण्यात आले होते. बगारे याची प्रकृती गंभीर असताना त्यास कोणाच्या दबावामुळे लगेच सोडून देण्यात आले याचीही कसून चौकशी करावी, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. डॉ. माधव कुंभार यांनी बगारे यांच्यावर उपचारांत हलगर्जीपणा केला आहे.  त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन चौकशी करण्याचीही मागणी पिरजादे यांनी  केली आहे.