Tue, Apr 23, 2019 14:16होमपेज › Sangli › निवडणुकीचे सर्वच परवाने बारा तासांत

निवडणुकीचे सर्वच परवाने बारा तासांत

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी 

महापालिका निवडणुकीसाठी पक्ष, उमेदवारांना लागणारे सभा, बैठकांसह सर्वच परवाने 12 तासांत दिले जातील, असे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. गेल्या अनेक दिवसांपासून परवान्यांबाबत गोंधळ सुरू होता. याबाबत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तक्रार केली. त्यानुसार त्यांनी खेबुडकर यांच्यासह अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान सार्वजनिक आणि खासगी बैठकांतून होणारा प्रचारही पूर्ण बंद राहील, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वच पक्ष, अपक्षांकडून प्रचाराचा धडका सुरू आहे. पण, निवडणूक आचारसंहितेअंतर्गत ध्वनिक्षेपक , सभा, प्रचार फेरी व अन्य कारणांसाठी निवडणूक कार्यालयाकडून परवाने मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी  होत्या. त्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष, उमेदारांमध्ये नाराजी  होती. सर्व पक्षीय कृती समितीने याप्रकरणी श्री. काळम-पाटील यांची भेट घेऊन तक्रार केली होती. यानंतर त्यांनी महापालिकेत येऊन माझ्याकडून सर्वच यंणेचा आढावा घेतला. 

खेबुडकर म्हणाले, परवान्याबाबत सुसूत्रता आणण्यासाठी पोलीस, निवडणूक अधिकारी व संबंधितांची बैठक झाली आहे. यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.प्रचाराच्या गाड्यांना ध्वनीक्षेपक, झेंडे व  प्रचार फेरी यांचे परवाने एक खिडकी कार्यालयाकडून घेण्याची गरज नाही. यासाठी संबधितांना थेट पोलिस प्रशासनच परवाने देईल. वाहनांवर एक किंवा दोन झेंड्यांनाच परवानगी आहे. त्याचीही परवानगी आरटीओ विभागच देईल.

ते म्हणाले, दोन पक्षांच्या निवडणूक प्रचार कार्यालयांमधील अंतर 500 मीटरपेक्षा जास्त असले पाहिजे. सांगलीवाडीत मात्र ही अट एका ठिकाणी शिथील केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत निवडणूक प्रचार करण्यात मनाई आहे. याची कडक अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे.

खेबुडकर म्हणाले, सर्वच प्रकारच्या परवान्यांसाठी राजकीय पक्ष, उमेदवारांची धावपळ होऊ नये, यासाठी एक खिडकी तयार करण्यात आली आहे. सांगली, मिरज व कुपवाड येथे तीन एक खिडकी कार्यालये कार्यरत आहेत. येथे पोलिस, महसूल, आरटीओसह महापालिकेच्या सर्वच अधिकारी, कर्मचार्‍यांना 24 तास कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत.

तीनही कार्यालयात आजअखेर 1243 अर्ज आले होते. त्यापैकी 1010 परवाने देण्यात आले असून, 233 परवाने प्रलंबित आहेत. ते त्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे अर्ज दाखल झाल्यापासून 12 तासांच्या आत परवाना दिलाच पाहिजे. या कामात कोणत्याही कर्मचार्‍यांनी हयगय केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.