Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Sangli › परवानगीसाठी हेलपाट्याने सर्वच पक्ष हैराण

परवानगीसाठी हेलपाट्याने सर्वच पक्ष हैराण

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 11:24PMसांगली : प्रतिनिधी

आचारसंहितेच्या बडग्यानुसार निवडणूक आयोगाने आता वाहनांपासून ते सभा, झेंड्यांसह प्रचारफेरी, प्रचारसभेसह सर्वांनाच परवानगीची सक्‍ती केली आहे. यामुळे सर्वच पक्ष हैराण झाले आहेत, अशी तक्रार आज मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्याकडे करण्यात आली. महापालिका, पोलिस व आरटीओ कार्यालयामध्ये समन्वय नसल्याने परवानगीसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि  जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केला. याप्रकरणी सुसूत्रता आणावी, अशी मागणी केली. यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी जिल्हाधिकार्‍यांना भेटून साकडे घालणार आहेत.

प्रा. पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी उभारण्यात आलेली  मतदान केंद्रे मतदारांसाठी गैरसोयीची आहेत. यासंदर्भात  आज प्रा. पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, शशिकांत गायकवाड यांनी खेबुडकर यांना निवेदन दिले. ही गैरसोयीची मतदान केंद्रे तातडीने बदलावीत, अशी मागणीही प्रा. पाटील यांनी केली. ते म्हणाले, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पालिका प्रशासन व निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मतदान केंद्रांमुळे मतदारांची गैरसोय होणार आहे. पार्श्वनाथनगर, वॉन्लेसवाडी, कृपामयी हॉस्पिटल परिसरातील नागरिकांना मतदानासाठी दोन किलोमीटर दूर मिरजेतील औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात जावे लागणार आहे. त्यासाठी दोनशे मीटरवर असणार्‍या महाविद्यालयाचा उपयोग करावा.

यशवंत कॉलनी, मिरज औद्योगिक वसाहत, अल्फोन्सा स्कूल, दुर्गानगर, गणेशनगर परिसरातील मतदारांसाठीही दोन किलोमीटर दूर अंतरावर मतदानकेंद्र  आहे. ही गैरसोईची मतदानकेंद्रे तातडीने बदलावीत. दरम्यान, प्रारूप मतदार यादीतील घोळाबाबत हरकत घेऊन त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या निवेदनाची तरी दखल घ्यावीपृथ्वीराज पाटील म्हणाले, परवान्यांसाठी एक खिडकी फक्त जाहीर केली आहे. परंतु तेथे पोलिस, आरटीओ, आयकर विभागासह कोणतेच अधिकारी नाहीत. त्यांच्यात एकसूत्रता नाही. त्यामुळे प्रचार काळात विविध पद्धतींच्या परवाने लादले  आहेत. ते वेळेत मिळत नाहीत. यासाठी प्रचार सोडून हेलपाटे मारावे लागत आहेत. ही सुविधा चोवीस तास खुली रहावी.  प्रचारासाठी जागाही निश्‍चित करून द्याव्यात, अशी मागणी केली.यासंदर्भात आयुक्त खेबुडकर यांनी संबंधित अधिकार्‍यांशी तात्काळ संपर्क साधून तसे आदेश दिले. आरटीओ, पोलिसांसह सर्वच विभागांनी यासाठी 24 तास अधिकार्‍यांची ड्युटी लावावी, अशा सूचना दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे मनोज भिसे आदींसह शिष्टमंडळ उपस्थित होते.

घरपट्टी भरा, मगच ‘त्या’ हॉलमध्ये सभांना परवानगी

सांगलीतील स्टेशन चौक तसेच मिरजेतील किसान चौक या परंपरागत चौकात होणार्‍या प्रचारसभांना वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रशासनाने बंदी केली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची मोठी कोंडी झाली आहे. पावसाळा असल्याने खबरदारी म्हणून हॉल, मैदानावर सभा घ्याव्या लागणार आहेत. परंतु त्यासाठीही निवडणूक विभागाची परवानगी आवश्यक आहे. एका पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आज आयुक्‍त खेबुडकर यांची भेट घेतली. परंतु या मैदान आणि इमारतीची घरपट्टी थकित आहे, ती भरल्यानंतरच परवानगी देऊ, असे सांगितले.त्यामुळे नाईलाजास्तव तेथील सभा बदलण्याची वेळ आली.