Tue, Apr 23, 2019 10:00होमपेज › Sangli › यहाँ पे सब शांती शांती हैं!

यहाँ पे सब शांती शांती हैं!

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 8:32PMसांगली : सुनील कदम

महापालिका निवडणुकीची  रणधुमाळी आणि प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरायला सुरूवातही झाली आहे. तरी अजूनही अनेक उमेदवार ‘समर्थ’ पक्षाच्या तर जवळपास सगळेच राजकीय पक्ष ‘मातब्बर’ उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत आहे. उमेदवारांसाठी राजकीय पक्षांनी ‘इलेक्टीव्ह मेरीट’ हा मापदंड लावल्याचे दिसत आहे, तर अनेक उमेदवारांनी पक्ष निवडीच्या बाबतीत ‘मालदार पार्टी’ला प्रथम प्राधान्य देण्याचा निकष निश्‍चित केल्याचे दिसत आहे. 

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून किंवा त्यापूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार का, झाली तर कुणाच्या वाट्याला किती जागा मिळणार याचा घोळ सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होऊनसुध्दा अद्याप आघाडी आणि जागावाटपाबाबत तिढा सुटलेला नाही आणि आणखी दोन-तीन दिवस याचा फैसला होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील अनेक उमेदवारांची द्विधा मनस्थिती आहे. आघाडी होणार का, झाली तर आपल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार, कोणते प्रभाग कोणत्या पक्षाला मिळणार आणि सर्वात शेवटी या सगळ्यात आपला नंबर लागणार का, याची भ्रांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक इच्छुक उमेदवारांना लागून राहिली आहे. त्यामुळे दोन्हीकडच्या काही उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर ऐनवेळची उपाययोजना म्हणून परस्परविरोधी नेत्यांशी संपर्क साधून ठेवलेलाच आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आणि जागावाटपाचा तिढा सुटला तरी नंतर एकमेकांचे उमेदवार ‘हायजॅक’ करण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा हमरीतुमरी माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर ऐन निवडणुकीत या दोन्ही पक्षांतर्गत पुन्हा बेदिली माजण्याची शक्यता दिसते.

अपेक्षेप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी सर्वाधिक रस्सीखेच ही काँग्रेसमध्ये दिसते आहे. त्यामुळे साहजिकच उमेदवार निवडताना काँग्रेसच्या नेतेमंडळींचा कस लागणार आहे. काँग्रेसमधील काही मातब्बरांनी निवडणुकीपूर्वीच बंडाचे निशाण फडकावलेले आहे आणि उमेदवारी निश्‍चितीच्या अखेरच्या दिवसापर्यंत काँग्रेसंतर्गत बंडखोरीची आणखी बरीच निशाणे फडकतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर काँग्रेसमधील अनेक इच्छुक सामावले जातील, पण आघाडी झाली तर मात्र काँग्रेसमध्ये संधी न मिळालेले अनेकजण दुसर्‍या पक्षात जाऊन बंडाचा झेंडा फडकावण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची मात्र द्विधा मनस्थिती झाल्याचे दिसत आहे. आघाडी केली आणि नाही केली तरीसुध्दा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बंडाळीची झळ बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादीची अवस्थाही काँग्रेससारखीच झाली आहे. काँग्रेसइतकी राष्ट्रवादीकडे उमेदवारांची भरमार नसली तरी सगळ्या जागांवर पुरून उरतील इतके इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीकडे असल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीने स्वबळावर लढावे, असा एक आग्रही गट आहे. आघाडी झाली तर कुणाला संधी द्यायची आणि कुणाला डावलायचे, असा फार मोठा पेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडल्याचे जाणवून येते. आघाडीनंतर संधी न मिळालेले राष्ट्रवादीतील अनेकजण अन्य पक्षांच्या आणि त्यातही प्रामुख्याने भाजपच्या गळाला लागतील, अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतावते आहे. कारण तसे झाले तर  ऐन निवडणुकीत हे बंडखोरच राष्ट्रवादीसाठी धोकादायक ठरू शकतात.

भाजपचे नेते काहीही दावा करीत असले तरी त्यांच्या महापालिकेतील सत्तेची सगळी मदार ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बंडखोरांवर अवलंबून असणार आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. त्यामुळे मुलाखतींचा फार्स उरकून घेतला असला तरी अजूनतरी भाजपने आपला एकही उमेदवार निश्‍चित केलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होते का, आघाडी झाली तर दोन्ही पक्षांच्या कितीजणांना आणि कुणाकुणाला संधी मिळणार, आघाडी नाही झाली तर कितीजणांना संधी मिळणार, कोण- कोण आणि कुठे-कुठे बंडाचे निशाण फडकविणार आणि सगळ्यात शेवटी त्यातील कोणकोण आपल्या गळाला लागणार, यावर भाजपच्या उमेदवारीची सगळी गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे उमेदवारीच्या बाबतीत भाजपने ‘वेट अँड वॉच’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणुकीतील प्रबळ दावेदार असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अजूनतरी सगळे काही शांत असल्याचे दिसत आहे. प्रत्येकाची पुढची चाल परस्परांच्या चालीवर अवलंबून असल्यामुळे आणि प्रत्येकजण पहिली चाल कोण करतो, या प्रतीक्षेत असल्यामुळे अजूनतरी कुणी कसल्याही ‘चाली’ करताना दिसून येत नाही. जशी अवस्था पक्षाची व नेत्यांची झाली आहे, नेमकी तशीच अवस्था सर्वच  इच्छुक उमेदवारांचीही झाली आहे. मुलाखती झाल्या असल्या, उमेदवारी अर्ज भरायची सिध्दता झाली असली तरी बर्‍याच उमेदवारांना आपल्या उमेदवारीची खात्री नाही. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर काय ‘स्टँड’ घ्यायचा, याच्या प्रतीक्षेत उमेदवार आणि त्याचे समर्थक दिसत आहेत.  सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि इच्छुक उमेदवारांच्या पातळीवर ‘सन्नाटा’  दिसत आहे.

पक्षनिष्ठा विरूध्द इलेक्टीव्ह मेरीट!

मुलाखतीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षनिष्ठेला प्रथम प्राधान्य देण्याची कळकळीची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे.  मात्र, उमेदवार निवडीच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या गोटात सुरू असलेल्या राजकीय हालचाली विचारात घेता या निवडणुकीत ‘मॅन, मनी आणि मसल पॉवर’ला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचप्रमाणे पक्षनिष्ठा वगैरे बाबी दुय्यम ठरून ‘इलेक्टीव्ह मेरीट’ हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार यात शंका नाही. त्यामुळे पक्षनिष्ठा, पक्षाची परंपरा, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी केलेला त्याग आणि पार्टी वुईथ डिफरन्ससारखे मुद्दे केवळ प्रचारात तोंडी लावायला शिल्लक राहणार आहेत.