होमपेज › Sangli › तुमचे भांडण नको, जनतेला विकास हवा

तुमचे भांडण नको, जनतेला विकास हवा

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 11:18PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

आयुक्‍त,  महापौर, पदाधिकार्‍यांचे भांडण आणि आंदोलनाशी जनतेला काही देणे-घेणे नाही. कसाही होऊ द्या पण शहराचा विकास हवा, असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीने आयुक्‍त, महापौर आणि सर्व पदाधिकार्‍यांना भेटून केले. यासाठी तुमच्या भूमिका काय, ते एका व्यासपीठावर येऊन मांडा. जनतेसमोरच सोक्षमोक्ष लावू, असे आवाहनही त्यांनी केले. याला सर्वांनीच तयारी दर्शविली. लवकरच याबाबत वेळ ठरवून जनता दरबार घेण्यात येईल, असे समिती सदस्यांनी सांगितले.

समितीचे सतीश साखळकर म्हणाले, विकासकामांच्या नावे कोटीच्या कोटी आकड्यांची उड्डाणे सुरू आहेत. मात्र शहराची दुरवस्था पाहता तो निधी गेला कुठे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. आयुक्‍त, महापौर, उपमहापौरांसह विरोधी पक्षनेते सर्वजण आम्ही विकासासाठी लढत असल्याचे सांगतात. एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. मग यात कोण बरोबर, कोण चुकीचे हा प्रश्‍न आहे. 

वि. द. बर्वे म्हणाले,  तुमची विकासाची नौटंकी जनतेला नको आहे. मूलभूत सुविधांसाठी किरकोळ कामे कोणाकडूनच मार्गी लागत नाहीत. रस्त्याची कामे निकृष्ट सुरू असून, त्यावर कोणाचा कंट्रोल नाही. सूचना देऊनही कामाच्या ठिकाणी फलक लागत नाही. याबाबत सतीश सावंत यांना विचारले तर ते मी काय काय करू? असे म्हणतात.

अमर पडळकर म्हणाले, सर्वांचाच वाद केवळ टक्केवारीसाठीच आहे, अशी जनतेत भावना निर्माण झाली आहे. महापौर आरोप करतात. राष्ट्रवादी महापालिकेत सत्याग्रह आंदोलन करते. महापौरांनीही या आंदोलनात उडी घेतली तेव्हाच हा संशय बळावला आहे. यामुळे कोण खरे-कोण खोटे हा प्रश्‍न आहे. प्रशासनाचे खच्चीकरण करायचा आमचा हेतू नाही. मात्र प्रशासनाने आपली भूमिका जाहीरपणे मांडली पाहिजे.

युनूस महात म्हणाले, आतापर्यंतचा महापालिकेचा हा सर्वाधिक वाईट काळ सुरू असल्याचे नागरिक बोलतात. अश्रफ वांकर म्हणाले, पालिकेतील रस्ते खड्डेमुक्त कधी होणार? 

कार्यकर्त्यांनी अमृत योजनेची जादा दराने दिलेली मंजुरी, ड्रेनेज योजना ठेकेदाराला बिले देण्यास दाखवलेली मेहरनजर, सिंधी मार्केटसह पालिकेच्या मालमत्ता कवडीमोल दराने देणे किंवा विकणे,  सुरू न झालेला लेसर शो अशा अनेक प्रश्नांचा आयुक्‍तांसमोर उहापोह केला. त्याचा सर्वांनीच जनतेच्या दरबारात खुलासा करावा. सोक्षमोक्ष लागेल. याला सर्वांनी तयारी दर्शविली.नगरसेवक गौतम पवार, महेश पाटील, आयुब पटेल, नितीन चव्हाण, उमेश देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.