Thu, Jul 18, 2019 04:28होमपेज › Sangli › सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण

सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:50PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले. सर्वपक्षीय नेत्यांनी बंडोबांना थांबविण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. आता 78 जागांसाठी तब्बल 451 उमेदवार मैदानात उतरले आहेत. सर्वच पक्षांना आता बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता अनेक प्रभागांत चौरंगी, तर काही प्रभागांत बहुरंगी लढती होणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आता रणांगण तापले आहे. दि. 1 ऑगस्टला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष, आघाड्यांनी जोरदार तयारी केली आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडीसह अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी केली. यामध्ये भाजपला थोपविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला. पक्ष, अपक्षांकडून तब्बल 1128 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातून छाननीत 153 अर्ज अवैध ठरले होते. 

दरम्यान, आज, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत होती.  सर्व पक्षांकडून 236 उमेदवार रिंणात होते, तर तब्बल 485 सर्वपक्षीय नाराजांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. यामध्ये सर्वाधिक बंडखोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपचे होते.या नाराजांनी काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या पुढाकाराने अपक्ष महाआघाडीची घोषणा केली. त्यांना खासदार राजू शेट्टी यांनी पाठबळ देत मोठे आव्हान दिले होते. यामुळे सर्वच पक्षांना फटका बसणार होता. त्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराला फाटा देत पक्षीय उमेदवारीतले बंडखोरांचे अडथळे समझोता करून  चर्चेने काढण्यास सुरुवात केली.

काँग्रेसकडून आमदार डॉ. विश्‍वजित कदम, सतेज उर्फ बंटी पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांनी माघारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील आदिंनी माघारीसाठी प्रयत्न केले. भाजपकडूनही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 

मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत  धडपड सुरू होती. यातून 485 इच्छुकांपैकी 263 उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांवर दबाब आणला; मात्र अनेक प्रभागात बंडखोर थंड झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही 78 जागांसाठी 451 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांच्या आघाडीचेही पॅनेल, प्रसंगी अपक्षही स्वतंत्रपणे मैदानात उभे ठाकणार आहेत. याचा परिणाम म्हणून आता सर्वच प्रभागात चौरंगी, बहुरंगी लढती होणार, हे स्पष्ट आहे. 

हे बंडखोर मैदानात

बंडखोरांना माघारीसाठी नेत्यांनी जंग जंग पछाडले; पण प्रमुख अनेक दिग्गज उमेदवारांनी सर्वच पक्षांविरोधात मैदानात अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आहे. यातील अनेक जणांनी चौघांचे पॅनेल केले आहे. बंडखोरांमध्ये नगरसेवक राजेश नाईक, अतुल माने, भूपाल सलगर, अशोक मासाळे, सौ. प्रियांका मिरासदार, माजी नगरसेवक विलास सर्जे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधुरी कलगुटगी, संदीप दळवी, भाजपचे नरेंद्र तोष्णिवाल, उमेश पाटील, अशोक शेट्टी, तर मनसेच्या वैशाली दळवी, सामाजिक कार्यकर्ते असिफ बावा, उमर गवंडी आदींचा समावेश आहे.