होमपेज › Sangli › सर्व शासकीय कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध

सर्व शासकीय कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध

Published On: Jan 01 2018 2:08AM | Last Updated: Dec 31 2017 10:22PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय, पाच प्रांत आणि दहा तहसीलदार कार्यालयातील सर्व शासकीय कागदपत्रे जनतेला ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सुमारे 1 कोटी 6 हजार कागदपत्रे स्कॅन करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना आता शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील यांनी  शनिवारी  पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी पाटील यांनी गेल्या सात महिन्यात केलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी महापालिकेचे आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  ते  म्हणाले, एका सेकंदात घरबसल्या ही माहिती मिळणार आहे. त्याशिवाय कोणती फाईल कोठे आहे याचीही माहिती रेकॉर्ड करण्यात आली आहे. त्यामुळे कागद सापडत नाही, अशी सबब संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना यापुढे सांगता येणार नाही. अशा पद्धतीने  ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध करणारा सांगली हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे.  

सर्व शासकीय कार्यालयात आधारकार्डाच्या धर्तीवर बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यात आली आहे. ती इंटरनेटला जोडली असल्याने जिल्ह्यातीलही कोणत्याही कार्यालयातील कर्मचार्‍याची हजेरीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणार आहे. त्यानुसार त्यांचा पगार काढला जाणार आहे. 

जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही

उपसा सिंचन योजनेतून जिल्ह्यातील 205 तलाव भरून घेतले आहेत. त्यामुळे एकही टँकर सध्या सुरू नाही. जप्त केलेल्या 850 ब्रॉस वाळूचा लिलाव काढून 51 लाख महसूल वसूल केला आहे. वाळूला पर्याय म्हणून ग्रीड उपलब्ध होण्यासाठी दगड खाणींना तीन दिवसात परवाना दिला जात आहे. जलयुक्त शिवारची या वर्षातील 766 कामे पूर्ण झाली आहेत.  उर्वरित कामे मार्चअखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. 161 प्रकल्पग्रस्तांना 104  हेक्टर जमीन देण्यात आली आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना 15 जानेवारीपर्यंत जागा देण्यात येणार आहेत.