Tue, Apr 23, 2019 14:05होमपेज › Sangli › उत्पादन शुल्ककडे आठ कोटींचा मुद्देमाल

उत्पादन शुल्ककडे आठ कोटींचा मुद्देमाल

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 10:35PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागात गेल्या आठ महिन्यांत दारू तस्करी, अवैध विक्रीसह विविध प्रकराचे चार हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांत आतापर्यंत 1 हजार 948 जणांना अटक करण्यात आली आहे. 183 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 7 कोटी 71 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याशिवाय गंभीर गुन्ह्यातील 24 गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. 

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांनी यावर्षी कारवाईचा धडाका लावला आहे. एप्रिलपासून नोव्हेंबरअखेरपर्यंत दारू तस्करी, अवैध विक्री, बनावट दारू तस्करी व निर्मिती, हातभट्टीवर कारवाईचा बडगा त्यांनी उगारला आहे. सर्व जिल्ह्यातील भरारी पथके नव्याने स्थापन करून त्यांनी कारवाईला गती दिली आहे. 

केवळ आठ महिन्यात पाचही जिल्ह्यात मिळून 4 हजार 178 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील 1 हजार 921 गुन्ह्यांत वार मिळाले असून 2 हजार 259 गुन्हे बेवारस आहेत. या गुन्ह्यांत 1 हजार 948 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 183 वाहने जप्त करण्यात आली आहे. या सर्व कारवाईत मिळून 7 कोटी 71 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अवैध दारूबाबतचे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी दरेकर यांनी पुढचे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत तडीपारीचे 24 प्रस्ताव पाठविण्यात आले असून 10 प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे. तर 79 प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्याशिवाय एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी आठ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. गुन्ह्यांना आळा घालण्यासोबतच त्यांनी महसूली उत्पन्न वाढीसाठीही विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.