होमपेज › Sangli › दारूबंदी ठरावाच्या अंमलबजावणीचे आव्हान

दारूबंदी ठरावाच्या अंमलबजावणीचे आव्हान

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 11:57PMइस्लामपूर : मारूती पाटील

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या इस्लामपूर शहरातील  ‘दारूबंदी’चा  ठराव एकदाचा पालिका सभागृहाने एकमताने मंजूर केला. मात्र यापुढे या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे खरे आव्हान सत्ताधार्‍यांसमोर आहे. कारण खरोखरच दारूबंदी करायची असेल तर  जनजागृतीचीही गरज आहे. हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात येणार का, याचीच आता शहरात चर्चा सुरू आहे. 

शहरात दारूबंदी व्हावी, असा ठराव डॉ. संग्राम पाटील सभापती असताना आरोग्य समितीने केला होता.तत्पूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनीही दारूबंदीची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून आघाडीच्या नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी दारूबंदीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पालिकेच्या  सभेत ठराव व्हावा यासाठी त्या आक्रमक होत्या. 
या ठरावावरून अनेक सभांत वादळी चर्चा झाली. सुप्रिया पाटील यांनी सभात्यागही केला होता. अखेर मंगळवारी झालेल्या सभेत सभागृहाने हा ठराव एकमताने मंजूर झाला. 

ठरावाला मंजुरी देताना विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अनेक शंका उपस्थित केल्या.  ठराव प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी कायदेशीर बाबींची पडताळणी करण्याचीही मागणी केली. कारण या ठरावाला कोणी न्यायालयात आव्हान दिले तर तो कागदावरच राहू नये, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र सभागृहाने ठराव मंजूर करून तो पुढील कार्यवाहीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडे दिला आहे. 

तो प्रस्ताव  त्या  विभागाकडे गेल्यानंतर त्यावर   अधीक्षक निर्णय घेतील. तत्पूर्वी शहरात प्रभागनिहाय दारूबंदीचा ठराव करावा लागणार आहे. प्रत्येक प्रभागातील किमान 25 टक्के महिलांनी दारूबंदीसाठी उत्पादन शुल्क विभागाला निवेदन द्यावे लागणार आहे. तसे निवेदन आल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग या निवेदनावरील सह्यांची पडताळणी करेल. नंतर ते निवेदन जिल्हा अधीक्षक व जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर  दारूबंदीवर निर्णय होऊ शकेल.जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिला तर उभी बाटली आडवी करण्यासाठी किमान 51 टक्के महिलांनी मतदान करणे आवश्यक आहे. तरच दारूबंदी शक्य आहे. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ आहे.शिवाय  महिलांमध्ये जनजागृतीही करावी लागणार आहे. यासाठी सत्ताधारी मंडळींना आत्तापासूनच काम सुरू करावे लागेल. दरम्यान दारूबंदी होऊ नये यासाठी काही हितसबंधीयांनीही  हालचाली सुरू केल्या आहेत.