Sat, Apr 20, 2019 17:56होमपेज › Sangli › ‘खुजगाव’ न झाल्याने दुष्काळी भागाचे नुकसान

‘खुजगाव’ न झाल्याने दुष्काळी भागाचे नुकसान

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 18 2018 12:23AM

बुकमार्क करा
इस्लामपूर : प्रतिनिधी

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या भूमिकेप्रमाणे जर  खुजगाव येथे धरण झाले असते तर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पूर्वभाग पूर्णपणे सिंचनाखाली आला असता. ते न झाल्याने दुष्काळी भागाचे नुकसान झाले, असे मत माजी पाटबंधारे राज्यमंत्री  अजितराव घोरपडे यांनी मांडले.  

राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 34 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘माझ्या आठवणीतील बापू’ या विषयावर आयोजित व्याख्यानात घोरपडे बोलत होते. आमदार  जयंत पाटील, माजी आमदार विश्‍वासराव पाटील, लालासाहेब यादव, तासगावचे अविनाश पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, सभापती सचिन हुलवान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

घोरपडे  म्हणाले, दुष्काळग्रस्त भागास पाणी द्यायचे असेल तर पाण्याचे साठे वाढवायला हवेत, अशी बापूंची भूमिका होती. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. सध्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी आले आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांची वार्षिक शेतीमालाची उलाढाल 5 हजार कोटींवर गेली आहे. जर खुजगाव येथे धरण झाले असते तर कवठेमहांकाळसह जत, आटपाडी, खानापूर या दुष्काळग्रस्त  तालुक्यांना खूप पूर्वीच पाणी मिळाले असते. जिल्ह्याच्या विकासाला प्रचंड गती मिळाली असती. रोजगार उपलब्ध झाला असता. ते म्हणाले, बापूंनी ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला, ते-ते आमदार झाले. त्यांनी  जिव्हाळा व आपुलकीने जिल्ह्यात, राज्यातही एक परिवार निर्माण केला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील म्हणाले, बापूंनी वाळवा तालुक्याचा सर्वांगीण विकासाबरोबर राज्याच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. प्रा.शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, तासगावचे राजाराम पाटील,  दिनकर पाटील, अमोल शिंदे, खंडू पवार, बाळासाहेब एडके उपस्थित होते. विजयबापू पाटील यांनी आभार मानले. प्रसिद्धी अधिकारी विश्‍वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.