होमपेज › Sangli › ऐतवडे, वशी ‘जलयुक्त गाव’ मध्ये अग्रेसर

ऐतवडे, वशी ‘जलयुक्त गाव’ मध्ये अग्रेसर

Published On: May 05 2018 1:37AM | Last Updated: May 05 2018 1:29AMऐतवडे बुद्रूक : सुनील पाटील

वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रूक, शिवपुरी, वशी या गावात शासनाच्यावतीने लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त गाव अभियानाने गती घेतली आहे. बंधारा, तलावातील सुमारे 2 हजारहून अधिक ब्रास गाळ काढून पाण्याची साठवणक्षमता निर्माण केली आहे. या जलयुक्त अभियानासाठी ही गावे पुढे सरसावल्याचे चित्र दिसून येत आहे. 

वाळवा तालुक्यातील सधन पट्ट्यात समाविष्ट असणार्‍या, परंतु केवळ विहीर बागायतीवर अवलंबून असणारे ऐतवडे बुद्रूक, शिवपुरी, ढगेवाडी, कार्वे आदी गावांचा परिसर आणि या परिसरातील पिकांचा पाण्यासाठी एकमेव पर्याय ठरलेले ओढ्यावरील बंधारे हाच एकमेव आधार शेतकर्‍यांचा आहे. 

ऐन दुष्काळाच्या काळात सधन पट्ट्याला भविष्यात दुष्काळाची झळ पोहोचू नये. याच उद्देशाने लोकसहभागातून शासनाच्यावतीने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा मूलमंत्र राबवून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्‍यात व पाझर तलावात आजवरच्या काळात साठलेल्या वाळू आणि गाळ काढून या बंधार्‍यांची व तलावाची पाणी साठवणक्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. 
दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाण्याच्या प्रश्‍नावर पाण्याचे पुनर्भरण हाच एकमेव उपाय असल्याने महसूल प्रशासनाने जलयुक्त गाव अभियानाचा धडक कार्यक्रम हाती घेतला असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले. 

पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, महसूल विभाग यांनी लोकसहभागातून कामाचे नियोजन केले असून या अभियानाला गती दिली आहे. वारणा पट्ट्यातल्या गावांचा आदर्श घेऊन अजूनही तालुक्यात पाणी टंचाई असणार्‍या गावांनी या जलयुक्त गाव अभियान राबवून आगामी पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करावीत, असे प्रांत जाधव यांनी सांगितले.