होमपेज › Sangli › जन्म-मृत्यू, विवाहाप्रसंगी  रोपांची भेट

जन्म-मृत्यू, विवाहाप्रसंगी  रोपांची भेट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ऐतवडे बुद्रूक : वार्ताहर

वातावरणात मोठ्या प्रमाणात होणार्‍या बदलांना सामोरे जाण्यासाठी ऐतवडे बुद्रूक ग्रामपंचायतीच्यावतीने ‘क्‍लायमेट प्रूफ व्हिलेज’ अशी संकल्पना स्वीकारली आहे. त्यामुळे  गावातील  जन्म, विवाह, परीक्षेतील यश, उत्तीर्ण विद्यार्थी, मृत्यूप्रसंगी रोप भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी संंबंधितांवर सोपविणार असल्याचे सरपंच प्रतिभा बुद्रूक यांनी सांगितले. 
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रूक ग्रामपंचायतीला सन्मती संस्कार मंचने दिलेल्या पत्राद्वारे नवीन उपक्रमाची अंमलबजावणी मासिक बैठकीमध्ये ठरावानुसार करण्याचा निर्णय सरपंच बुद्रूक यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात घेऊन घेतला.उपसरपंच सौरभ पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी डी. पी. सिंग उपस्थित होते. 

‘वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम राबविणार आहे. रोपांची उपलब्धता ग्रामपंचायत करणार आहे. या वर्षात जन्माला आलेल्या बालकांचे स्वागत फळझाडांच्या स्वरूपात ‘शुभेच्छा वृक्ष’ देवून,  विवाहाप्रसंगी ‘मंगल वृक्ष’ तसेच मुलींच्या विवाहाप्रसंगी ‘माहेरचे झाड’, परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, नोकरी मिळालेले तरूण आणि निवडणुकीत विजयी होणार्‍या उमेदवारांना ‘आनंद वृक्ष’ देण्यात येणार आहे. निधन झालेल्या व्यक्तींच्या घरी फळझाडाचे रोप देऊन श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.हा उपक्रम वर्षात टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी घेतला. सन्मती संस्कार मंचने नवीन उपक्रम राबविण्यासाठी दिलेल्या पत्राची दखल घेऊन त्या संघटकांचा सन्मान केला. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचेही आवाहन ग्रामविकास अधिकारी डी. पी. सिंग यांनी केले.

Tags  :  Sangli, Sangli News, Aitawde Budruk, Gram Panchayat, undertakes, plant, change, environment.


  •