Thu, Jun 27, 2019 18:04होमपेज › Sangli › सांगलीत शेतीमाल विक्रीसाठी वातानुकूलित मॉल

सांगलीत शेतीमाल विक्रीसाठी वातानुकूलित मॉल

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 15 2018 8:48PMसांगली :  शशिकांत शिंदे

येथील विजयनगरमध्ये केवळ  शेतीमाल विक्रीसाठी कृषीविभागातर्फे मॉल  उभारण्यात येत आहे. सुमारे 57 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा मॉल पूर्णपणे वातानुकुलित असणार आहे. या ठिकाणी केवळ शेतकर्‍यांनाच त्यांच्या मालाची विक्री करता येणार आहे. 

ग्राहकांना ताजा भाजीपाला हवा असतो. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यावर भरणार्‍या बाजारातूनच भाजीपाला खरेदी करावा लागतो. या बाजारात बहुसंख्य व्यापारीच असतात. या ठिकाणी येणार्‍या शेतकर्‍यांवर  अनेकदा व्यापार्‍यांकडून  दबाव आणला जातो. त्यामुळे त्या भाजी बाजारात शेतकर्‍यांना त्यांचा शेतीमाल विकणे कठीण जाते. तो शेती माल त्यांना व्यापार्‍यांनाच विकावा लागतो. ती विक्री घाऊक पध्दतीने असलेने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे भाजीपाला उत्पादनातून फारसा लाभ शेतकर्‍यांना मिळत नाही.

त्या शिवाय भाजीपाला नाशवंत असल्याने तो साठवण करूनही ठेवता येत नाही. सांगली परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला तयार होतो. तो थेट ग्राहकांना मिळावा, यासाठी केवळ शेतीमालाचा मॉल उभारण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी घेतला होता. त्याप्रमाणे  विजयनगर येथे नूतन न्यायालयाच्या इमारती शेजारी या मॉलच्या इमारतीचे काम सध्या जोरदार सुरू आहे. या मॉलमध्ये  2 हजार 9 चौरस मीटरचा हॉल शेतमाल विक्रीसाठी उभारण्यात येत आहे. 

त्या शिवाय शेतमाल साठवणुकीसाठी गोदामही असणार आहे. हा मॉल वातानुकुलित असणार आहे. शेतकर्‍यांना बसण्यासाठी कट्टे बांधले जाणार आहेत. येत्या दिवाळीपर्यंत हा मॉल सुरू करण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.