Wed, Nov 21, 2018 03:11होमपेज › Sangli › दूध, शेतमाल रस्त्यावर 

दूध, शेतमाल रस्त्यावर 

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 10:52PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शिरढोण येथे रस्त्यावर शेतीमाल आणि दूध ओतून राग व्यक्त करण्यात आला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाने शासनाला जाग येत नसेल, तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ. दिगंबर कांबळे म्हणाले, बंदच्या सातव्या दिवशीही हमीभाव मिळण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. रानात काबडकष्ट करून शेतीमाल पिकवायचा. मात्र तो बाजारात नेण्यासाठी गाड़ी खर्चही   शेतकार्‍यांना परवडत नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नाही.

तालुका सरचिटणीस कॉ. डॉ. सुदर्शन घेरड़े म्हणाले, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव, दुधाला रास्त भावाचा तसेच रत्नागीरी-नागपूर, विजापूर-गुहागर रस्त्याचे जबरदस्तीने होणारे जमीन अधिग्रहण थांबवावे. कॉ. गवस शिरोळकर म्हणाले, देशात तूर, साखर पडून असल्याने भाव कोसळले आहेत. अशा  परिस्थितीतही भाजप सरकार देशात मोझॅम्बीकची तूर व पाकिस्तानची साखर आयात करीत आहे. आंदोलनात सचिन पाटिल, सागर पाटील, नितिन पाटील, आप्पालाल मुलाणी, उदय पाटील, नामदेव पाटील, दत्ताजीराव शिंदे, नारायण चौगुले, मच्छिंन्द्र पाटील, रजनीकांत पाटील, एम. एस. पाटील, प्रमिला मोरे, वैभव सरवदे, राहुल मदने, संपत पाटील उपस्थित होते.