Sun, May 26, 2019 01:36होमपेज › Sangli › आष्ट्यात पुन्हा व्हिडीओ गेमची लूटमार सुरू

आष्ट्यात पुन्हा व्हिडीओ गेमची लूटमार सुरू

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 8:57PMआष्टा : प्रतिनिधी

मागील जवळपास एक वर्षापासून बंद करण्यात आलेले आष्ट्यातील  व्हिडीओ गेमचे जुगार अड्डे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चोरीछुपे सुरू करण्यात आलेले आहेत. सध्या गावात भावई यात्रा सुरू आहे. त्यामुळे शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे अड्डे तातडीने बंद करण्याची आवश्यकता आहे.

आष्ट्यात गेल्या काही वर्षात चार-पाच ठिकाणी व्हिडीओ गेमचे जुगार अड्डे सुरू करण्यात आलेले आहेत. आष्टा परिसरातील युवक आणि प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसते. अनेकांनी या जुगाराच्या नादी लागून आपल्या घरादारावर आणि शेतीवाडीवर पाणी सोडल्याची उदाहरणेही भरपूर आहेत. या व्हिडीओ गेममधील सेटिंगमुळे आणि त्या माध्यमातून चालणार्‍या लूटमारीमुळे हे अड्डे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. त्या ठिकाणी चालणार्‍या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून अनेकवेळा हाणामारीचे प्रसंगही उद्भवतात.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक शर्मा यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातील व्हिडीओ गेम सेंटर्सवर कारवाई करून ते बंद केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आष्टा शहरातील व्हिडीओ गेम सेंटर्स चोरीछुपे पुन्हा चालू करण्यात आलेली दिसत आहेत. या माध्यमातून दिवसाकाठी हजारो रुपयांची उलाढाल सुरू असून युवक आणि विद्यार्थी पुन्हा या जुगाराच्या आहारी जाताना दिसत आहेत. मात्र पोलिसांसह अन्य संबंधित यंत्रणांनी त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसत आहे.सध्या आष्ट्यात भावई यात्राउत्सव सुरू आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक येत असतात. यात्राकाळात या व्हिडीओ गेम चालकांकडून नेहमीप्रमाणे यात्रेकरूंची आणि भाविकांची लूटमार होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचप्रमाणे या कारणावरून वादंग माजण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ही व्हिडीओ गेम सेंटर्स तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे.