Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Sangli ›  पुन्हा २४ कोटी खर्चून निकृष्ट रस्तेकामे

 पुन्हा २४ कोटी खर्चून निकृष्ट रस्तेकामे

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 11 2017 11:33PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

खड्ड्यांत लोटलेल्या महापालिका क्षेत्रात अखेर 24 कोटी रुपयांच्या रस्तेकामांना मुहूर्त लागला. ती कामे दर्जेदार झालीच पाहिजेत यासाठी पाच वर्षे गॅरंटी आणि कामांच्या फलकाची आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी सक्‍तीही केली. पण ते सर्व आदेश धाब्यावर बसवून निकृष्ट कामाचाच सपाटा सुरू असल्याचे दिसून येत आहे. रोड रजिस्टर नाहीच. शिवाय सुरू असलेल्या कामांचा अनेक ठिकाणी याचा नागरिकांकडून पंचनामाही सुरू आहे. यामुळे पुन्हा एकदा या 24 कोटी रुपयांचा खर्च निरुपयोगीच ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांत शहरातील सर्वच मुख्य व अंतर्गत रस्ते खड्ड्यांत लोटले होते. यामुळे सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्ष व  सर्व संघटनांनी आंदोलने केली. नागरिकांनीही खड्डेनगरी नामकरण करीत निदर्शनेही केली होती. 

वास्तविक महापालिकेच्यावतीने 24 कोटी आणि आमदार निधीतून 33 कोटी रुपयांच्या रस्ते कामे मंजुरीचा घोळ वर्ष-दीड वर्ष सुरूच राहिला. दुबार नावे आणि त्याद्वारे लुटीचा फंडाही समोर आला. त्यामुळे खेबुडकर यांनी या याद्या बदलल्या.  प्रशासनाच्या या खबरदारीमुळे विलंबही झाला. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.  अखेर महापालिका क्षेातील 24 कोटी रुपयांच्या रस्तेकामांचा मुहूर्तही झाला.

या 24 कोटींच्या कामांतून मुख्य मार्गांसह अंतर्गत प्रमुख रस्त्यांची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर खरोखरच खड्डेमुक्‍त होईल, असा आशावाद निर्माण झाला होता. त्यासाठी आयुक्‍तांनी नागरिकांनाही ‘वॉच’ ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु महापालिकेच्या नेहमीच्या पठडीनुसारच पुन्हा या रस्तेकामांचा सपाटा सुरू आहे. यामध्ये कोठेही रस्त्यांच्या दर्जा, त्याची किंमत याचे फलक लावण्यात आलेले नाहीत.   खडीकरण, डांबरीकरणाचा फार्सच अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

काही ठिकाणी तर नागरिकांनी हाताने रस्ते उकरून डांबराचा पत्ताच नसल्याचे दाखवून दिले आहे. अधिकार्‍यांना जागेवर बोलवून घेतले. तरीही प्रशासनाकडून या कामांचे समर्थनच सुरू आहे. एकीकडे वारंवार मागणी करूनही रोड रजिस्टरची सक्ती प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे कोणते रस्ते कधी केले, त्यावर किती खर्च झाला याची नोंदच नाही. आताही त्याच पद्धतीने कागदोपत्री गॅरंटीची कमिटमेंट दाखवून निकृष्ट कामाचा सपाटा सुरू आहे. पुन्हा तक्रारी झाल्याच तर पावसाने पाणी साचून रस्ते खराब झाले हे ठरलेले उत्तरच राहणार आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा हे 24 कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत. रस्ते पुन्हा खड्ड्यात लोटले जाण्याचा धोका आहे.