Tue, Apr 23, 2019 02:01होमपेज › Sangli › सर्वच पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई

सर्वच पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMसांगली : अमृत चौगुले

प्रभागरचना आणि आरक्षण  जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. जवळजवळ  सर्वच पक्षांतून उमेदवारांची पळवापळवी होणार हे उघड आहे. पण चार सदस्य प्रभागरचनेमुळे विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांना प्रभाग टिकविणे आणि आपल्यासोबतच चारजणांना निवडून आणणे असे    आव्हान आहे.  नव्या इच्छुकांनाही  विजयासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी तीन शहरात 20 प्रभागात 78 जागांसाठी  लढती होणार आहेत. आरक्षित तसेच खुल्या प्रभागातून साहजिकच शेकडो उमेदवार इच्छुक आहेत.  सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडी, भाजप, शिवसेना, महापालिका संघर्ष समिती, आम आदमी पार्टी, शहर सुधार समिती असे पक्ष आणि संघटना मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे सर्वच प्रभागात बहुरंगी निवडणूक रंगणार हे स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत महाआघाडीचा पराभव करून  महापालिकेत  कॉँग्रेसची सत्ता प्रस्थापित  करण्यासाठी काँग्रेसनेते (कै.) डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केले होते. आता त्यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेत असूनही पक्ष एकसंध ठेवण्यासह मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी यावेळी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, नेत्या श्रीमती जयश्री पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवानेते विशाल पाटील आदिंना  मोट बांधावी लागणार आहे. 

राष्ट्रवादीकडे आमदार जयंत पाटील यांचे खंबीर नेतृत्व आहे. विरोधी पक्ष म्हणून महापालिका क्षेत्रात चांगली बांधणीही आहे. पण शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत.  गटबाजी संपवून स्व:बळावर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला  चांगलीच कसरत करावी लागणार आहे. 
महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठीही भाजपने चंग बांधला आहे. त्यासाठी नेत्यांची फौज सांगलीत येऊन वातावरण  तापवत आहे. परंतु सर्वच प्रभागात त्यांच्याकडे ताकदवान उमेदवार आहेत, अशी स्थिती नाही.  त्यासाठी आयात पॅटर्न वापरला जाणार का, ते लवकरच समजेल.

भाजपमध्ये प्रश्न केवळ सक्षम उमेदवारांचाच नाही, तर नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नांचाही आहे. खासदार संजय पाटील, आमदार गाडगीळ, सुरेश खाडे कितपत एकदिलाने ताकद पणाला लावतात त्यावरच भाजपचे सत्तेचेे गणित ठरेल.

माजी आमदार संभाजी पवार,  पृथ्वीराज पवार, काँग्रेसमधून आलेले जिल्हा संघटक दिगंबर जाधव,  नगरसेवक शेखर माने यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.  जिल्हाध्यक्ष संजय विभुते, आनंदराव पवार यांच्यासह अनेकजणांनी स्व:बळावर ताकद अजमावणार अशी घोषणा केली आहे. परंतु गौतम पवार यांनी भाजपसोबत महायुतीचे सुतोवाच केले आहे. त्याला अंतर्गतविरोधही होऊ लागला आहे. 

सांगली जिल्हा सुधार समितीनेही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांनीही शहराला चांगला पर्याय देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.  अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे,  रविंद्र चव्हाण, तानाजी रुईकर आदींसह अनेकजण मैदानात उतरणार आहेत.  मिरज पॅटर्नच्या कारभार्‍यांनीही आता महापालिका संघर्ष समितीद्वारे वेगळा गट बांधला आहे. तेही किमान मिरजेतून तरी ताकदीने मैदानात उतरणार हे स्पष्ट आहे.

Tags : Sangli, Sangli News, After announcement, reservation,  ward allotment, the movement,  all the parties, accelerated