Sat, Feb 23, 2019 18:31होमपेज › Sangli › कोट्यवधी रुपये खर्चूनही ड्रेनेजला गळतीच

कोट्यवधी रुपये खर्चूनही ड्रेनेजला गळतीच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरजेतील मूळ गावठाणमध्ये आता ड्रेनेज योजना कालबाह्य झाली आहे. दुरुस्तीबाबतही योग्य नियोजन नाही. त्यामुळेच सांगलीत शिवाजी मंडई, गावभाग परिसरात ड्रेनेज तुंबले आहे. दुसरीकडे विस्तारित भागात सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेची कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. बिलांची कोट्यवधी रुपयांची उधळण करूनही निकृष्ट योजनेचे काम आराखड्याला तिलांजली देणारे आहे. एचटीपीचे (मलनि:स्सारण केंद्राचे) कामही रखडले आहे. 

योजना कार्यान्वित झाल्यानंतर खर्‍या अर्थाने सांडपाणी वाहणार्‍या पाईपलाईन आणि योजनेच्या निकृष्ट कारभाराचा पंचनामाच समोर येईल.सांगली, मिरजेत नगरपालिका काळात मूळ गावठाणामध्ये ड्रेनेज पाईपलाईन होत्या. त्या 1960 च्या सुमारास टाकल्या आहेत. त्यावेळच्या लोकसंख्येनुसार मलनि:स्सारण केंद्रेही उभारण्यात आली होती. त्यामध्ये सांगलीतील सांडपाणी थेट नदीत न सोडता ते भारतभीम जोतिरामदादा पाटील आखाड्याजवळच्या केंद्राकडे नेले जात असे. 

सांगलीतील मूळ गावठाण, वखारभाग, खणभाग, विश्रामबागसह सर्वच परिसरातून येणारे सांडपाणी या केंद्रात नेले जात असे. शिवाय ते शुद्धीकरणानंतर कोल्हापूर रस्ता, भारतनगर ते हरिपूर रस्ता लोखंडी पुलामार्गे नदीत सोडले जात असे. शिवाय ओव्हर फ्लो झाल्यानंतर ते पाणी याचमार्गे नदीत सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. परंतु तत्कालीन महाआघाडीच्या काळात सांगली आणि मिरजेत विस्तारित भागात शुद्धीकरणासाठी ड्रेनेज योजना मंजूर करण्यात आली. यामध्ये सांगलीसाठी 49.82 टक्के तर मिरजेसाठी 53.68 टक्के वाढीव किमतीने निविदा मंजूर केली. ठेकेदार एसएएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला हा ठेका देण्यात आला. त्यातून सांगलीची 64.71 कोटी रुपयांची योजना 96.95 कोटींवर तर मिरजेची 50.45 कोटींवरून 77.54 कोटी रुपयांवर गेली. 

परंतु गेल्या आठ वर्षांत दोन्ही शहरात विस्तारीत भागात ड्रेनेज योजनेचा खेळखंडोबा सुरूच आहे. अनेक ठिकाणी मुख्य वाहिन्यांचा पत्ता नाही. हनुमाननगर येथील मलनि:स्सारण केंद्राचे काम वारंवार मुदत देऊनही पूर्ण झालेले नाही. जुन्या जोतिरामदादा पाटील कुस्ती आखाडा येथील मलनि:स्सारण केंद्र नूतनीकरणासाठी बंद आहे. त्यामुळे या केंद्राकडे जाणारे गावभाग, गणपतीपेठ, खणभाग, विश्रामबाग, खणभाग येथील सांडपाणी भारतनगरच्या चौकापासून थांबविले आहे. तेथून ओव्हरफ्लोसाठी असलेल्या अपुर्‍या दाबनलिकेतूनच पाईपलाईन खराब झाल्यानंतर हे सर्व सांडपाणी जोडले. तेथून ते हरिपूर लोखंडी पुलाकडून कृष्णा नदीत सोडले आहे. त्यामुळेच शिवाजी मंडई, आनंद चित्रमंदिरजवळ असलेली चेंबर्स भरली की  बॅक वॉटर शिवाजी मंडई ते भारतनगरपर्यंत पसरते. त्याचाच फटका गेल्या चार दिवसांपासून मारुती चौक, शिवाजी मंडई, गावभाग ते भारतनगरपर्यंतच्या नागरिकांना बसू लागला आहे. 

Tags : Sangli, Sangli News, spending, billions, rupees, drainage leakage


  •