होमपेज › Sangli › ...अखेर ती काळी बाहुली मनपाने हटवली

...अखेर ती काळी बाहुली मनपाने हटवली

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:22PMमिरज : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 6 मध्ये काही उमेदवारांच्या समर्थकांनी  प्रतिस्पर्धी  उमेदवारावर  मात करण्यासाठी प्रभागात प्रवेश करणार्‍या रस्त्यावर लक्ष्मी मार्केटजवळ मोठी काळी बाहुली लटकवली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने सदरची काळी बाहुली हटविली आहे.

निवडणुकीत विजयी होणार की नाही, प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव कसा करता येईल? यासाठी बुवाबाजी आणि जादूटोणा आदीचा पुरेपूर वापर होताना दिसून येत आहे. प्रभाग क्र. 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि अपक्षांची लढत असल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे. उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकमेकांवर जादूटोणाचा व बुवाबाजीचा प्रयोग केला आहे.बुवाबाजी आणि जादूटोणाचा वापर काही जणांकडून होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका उमेदवाराच्या समर्थकाने ‘ईडा पीडा टळो’ जादूटोणाचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून पीर नालसाब चौकात एक काळी बाहुली लटकविण्यात आली होती. या प्रकाराची प्रभागामध्ये जोरदार चर्चा आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काळी बाहुली लटकविल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने ही काळी बाहुली हटविली आहे. तसेच संबंधित अज्ञाताविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे महापालिका उपायुक्‍त स्मृती पाटील यांनी सांगितले. प्रभाग क्र. 6 बरोबरच अन्य प्रभागातही काही प्रमाणात संबंधित उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर बुवाबाजीचे प्रकारही होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रभाग क्र. 6 मधील काळ्या बाहुलीची शहरात चर्चा आहे.