Thu, Jul 18, 2019 00:47होमपेज › Sangli › महापौर निवडीचा मुहूर्त १५ ऑगस्टनंतर?

महापौर निवडीचा मुहूर्त १५ ऑगस्टनंतर?

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 11:00PMसांगली : प्रतिनिधी

नवनिर्वाचित 78 नगरसेवकांची नावे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यासाठी सोमवारी प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्‍तांकडे ती यादी सादर केली जाणार आहे. मंगळवारी ती नावे प्रसिद्ध होतील, अशी शक्यता आहे. त्यानंतर सात दिवसांच्या मुदतीत सभा होईल. त्यानुसार दि. 15 ऑगस्टनंतरच महापौर निवडीसाठी सभा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्याला दुजोरा दिला. दरम्यान, सत्तारूढ भाजपतर्फे महापौरपदाचे उमेदवार, गटनेते तसेच अन्य पदांबाबत चर्चेसाठी बुधवारी बैठक होणार आहे.  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पाडली. 20 प्रभागातील 78 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये 41 जागांवर भाजप, 20 जागांवर काँग्रेस आणि 15 जागांवर राष्ट्रवादीचे  सदस्य विजयी झाले. स्वाभीमानी विकास आघाडी व अपक्ष एकेक  जागा मिळाली आहे. 

महापालिकेचे हे पाचवे नगरमंडळ आता स्थापन होत आहे. मावळत्या नगरमंडळाची  मुदत दि. 13 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी महापौर निवडीसाठी भाजप नेते प्रयत्नशील होते. परंतु सर्व सदस्यांची राजपत्रात नोंद होणे गरजेचे आहे. ती मंगळवारपर्यंत होईल. त्यानंतर महापौर निवडीसाठी पहिली महासभा बोलवण्यात येईल.महापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्ताव पाठवला जातो. त्यांच्या मान्यतेनंतर सात दिवसांची नोटीस देऊन महापौर निवडीची सभा बोलवली जाते. 

दि. 7 ऑगस्टला विभागीय आयुक्तांनी मान्यता मिळाली तरी दि.14 ऑगस्टला सभा होऊ शकत नाही.त्यानंतर दोन सुट्या आहेत. त्यामुळे  दि. 18 ऑगस्टला महापौर निवडीसाठी सभा होण्याची शक्यता आहे. मात्र सोमवारी एका दिवसात राजपत्र प्रसिध्द झाले आणि विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली तर  दि. 14 ऑगस्टला महापौर निवड शक्य असल्याचेही काही अधिकार्‍यांनी सांगितले.