Wed, Apr 24, 2019 07:57होमपेज › Sangli › पाकिस्तानची संस्कृतीच खोटारडेपणाची

पाकिस्तानची संस्कृतीच खोटारडेपणाची

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 11:54PM

बुकमार्क करा
मिरज : शहर प्रतिनिधी

कुलभूषण जाधव यांच्या आईला व पत्नीला पाकिस्तानमध्ये न जाण्याचा सल्ला मी दिला होता. कारण पाकिस्तान काय आहे याचा मी अनुभव घेतला आहे. पाकिस्तानची संस्कृतीच खोटारडेपणाची आहे, अशी घाणाघाती टीका विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी येथे केली. 

येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 50 वर्षांंतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांची प्रकट मुलाखत डॉ. दयानंद नाईक यांनी घेतली. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद परमशेट्टी यांनी स्वागत केले. 

अ‍ॅड. निकम म्हणाले, माझी इच्छा नसताना मी वकील झालो. आजही वकिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा वेगळा आहे. मी सायन्सचा विद्यार्थी होतो. मला वडिलांसाठी मी वकील बनलो. लॉसाठी जेव्हा मी अ‍ॅडमिशन घेतले त्यावेळी मी खूप नाराज झालो होतो. पण कायद्याची भिती गुन्हेगारांना वाटली पाहिजे, असेच  काम मी वकील म्हणून केले. संस्कृत भाषेमुळे आपली संस्कृती कळते त्यामुळे  न्यायालयात मी संस्कृत सुभाषिते वापरतो. 

मुंबईवर कसाब आणि अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत त्यांनी एक गुपित आज  जाहीर केले. ते म्हणाले, कसाबला कधीही बिर्याणी दिली नाही. न्यायालयात रडण्याचा त्याने बनाव केला होता. त्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे त्याला सहानुभूती मिळू नये यासाठी मीच कसाबने बिर्याणी खायला मागितल्याचे सांगितले होते.‘ मुंबईतील हल्ल्याचे कृत्य मी केलेच नाही’ असे कसाब भासवत होता. पण पाकिस्तानने तो कट रचला आणि कसाब व त्याच्या साथीदारांनी तो पार पाडला, असे न्यायालयात सिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो. 

 अ‍ॅड. निकम म्हणाले, कुलभूषण जाधव यांच्या आईला व पत्नीला पाकिस्तानमध्ये न जाण्याचा सल्ला मी दिला होता. कारण पाकिस्तान काय आहे याचा मी अनुभव घेतला आहे. पाकिस्तानची संस्कृतीच खोटारडेपणाची आहे. कदाचित  नातेवाईकांसमोर ‘मी भारत गुप्तहेर आहे’ असे  सांगण्यास ते कुलभूषण यांच्यावर दबाव आणतील आणि त्याचे ते भांडवल करतील, अशी मला भिती वाटत होती. अजूनही त्यांचे भेटीत काय संभाषण झाले हे पुढे आलेले नाही. कुलभूषणच्या आई व पत्नीच्या बुटात चीप होती असे पाकिस्तान म्हणत आहे. या पाकिस्तानची यंत्रणा  भिकारडी आहे. संस्कृतीच खोटारडीपणाची आहे. 

सन 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणाविषयी ते म्हणाले, खोटी गांधीगिरी करून पाप धुतले जात नाही हे त्यावेळी मी सिद्ध केले आहे. दुर्देवाने आपली तरूण पिढी ही चित्रपटातील कलाकारांना आपले आदर्श मानतात. याचा विचार व्हायला पाहिजे. 

ते पुढे म्हणाले, मला तुरूंगातून अनेक गुन्हेगारांची पत्रे येतात. ‘आम्हाला माफ करा’, असे ते त्यात म्हणतात. पण मी काही करू शकत नाही. ते म्हणाले, शिक्षकांनी प्रामाणिक विद्यार्थी घडविले पाहिजेत. मी नास्तिक किंंवा आस्तिकही नाही. पण आई आणि नंतर पत्नी यांच्या आग्रहासाठी देवाला नमस्कार करतो. 

ते म्हणाले, माझे वडील साने गुरूजींच्या सानिध्यात वाढले. ते लंडनचे वकील होते. एकीकडे पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे कपडे हे लंडनमध्ये इस्त्री करून यायचे. माझे वडील माझे कपडे इस्त्री करीत होते. त्यामुळे मला पंडीत नेहरूंपेक्षा आपण मोठे असल्यासारखे वाटायचे अर्थात  ही बाब मी गंमतीने सांगतो. आत्मचरित्र लिहिण्याचा मी गांभीर्याने विचर करीत नाही. कारण देशातील अनेक गोपनीय गोष्टी माझ्याकडे आहेत. त्या जाहीर करता येत नाहीत. त्यामुळे माझे आत्मचरित्र हे अर्धसत्य असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. 

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, आमदार सुरेश खाडे, लेखक अच्युत गोडबोले, नाट्य कलाकार संदीप खरे, ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता चव्हाण, स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.