Tue, Nov 20, 2018 21:05होमपेज › Sangli › संविधानाला मनुवाद्यांचा वाढता धोका

संविधानाला मनुवाद्यांचा वाढता धोका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पलूस : प्रतिनिधी

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सत्‍तर वर्षानंतरही  भारतीय संविधानाचा   खरा अर्थ आपल्याला समजलाच  नाही.  आज या संविधानाला सामाजिक आणि राजकीय ग्रहण लागले असून, मनुवाद्यांचा धोका वाढू लागला आहे, असे मत कामगार नेते अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी व्यक्‍त केले. 

पलूसमध्ये आयोजित संविधान जागर परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन राम लाड होते. अ‍ॅड. शिंदे पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी घटना लिहून राजाचा जन्म राजघराण्यात व्हायचा बंद केला. आता राजाचा जन्म मतदान केंद्रात होतो. आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा हक्क तुम्ही पैसे घेतल्या शिवाय देत नाही. त्यामुळे संविधान बुडवले म्हणून ओरडायचा अधिकार तुम्हाला नाही. संविधानाला लागलेले ग्रहण  हे  सामाजिक आहे. सत्तर वर्षात आर्थिक सामाजिक समतेसाठी राजकर्त्यांकडून प्रयत्न झाले नाही. सामाजिक विषमता घालवण्यासाठी संविधान जागर गरजेचाच आहे. 

थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन होते पण विचारांचे काय? विचारांप्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे. भांडवली पक्षांनी जनतेला लाभार्थी केले. जनतेला भीक मागायची सवय लावून संविधान कमकुवत करायचे काम सुरू केले आहे, असे ते म्हणाले. 

डॉ. अमोल पवार यांनी  प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांनी सर्वांना संविधानाची शपथ दिली. विशाल शिरतोडे यांनी परिचय करुन दिला. प्रा. लक्ष्मण शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. पाटील, अर्जुन जाधव, संदेश भंडारे, अनुपमा एन. व्ही. सरपंच विजय आरबुने, राजेंद्र चौगुले, प्रमिला पुजारी, संपत पाटील, प्रमोद जाधव, रवींद्र येवले, दीपक लाड, सुधीर जाधव, जयवंत मोहिते, किरण शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन मारुती शिरतोडे यांनी 
केले.