Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Sangli › खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाली उदंड!

खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाली उदंड!

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Nov 30 2017 8:55PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

अलिकडे बाजारात असा एकही खाद्यपदार्थ सापडत नाही की ज्यामध्ये भेसळ नाही. धान्ये, कडधान्ये, भाजीपाला, चहा पावडर, मिरची पावडर, फरसाणा, चिवडा, चकली, लाडू, बिस्किटे, चॉकलेट, गोळ्या यासह जे जे काही म्हणून लोकांच्या दैनंदिन आहारात येते, त्या सगळ्या पदार्थांना भेसळीने ग्रासले आहे. त्याचप्रमाणे ही भेसळ साधीसुधी नाही तर लोकांच्या आरोग्याचा कचरा करून कधी कधी जीवघेणीही ठरत आहे.

आजकाल ग्राहकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून चक्क हायब्रीड ज्वारी त्याच्या गळ्यात मारली जात आहे. तुरीची डाळ म्हणून लाख नावाच्या पशुखाद्यासाठी वापरण्यात येणार्‍या कडधान्याची डाळ विकली जात आहे. साजूक तुपात चक्क रवा मिसळण्यात येतो, तर लोण्यामध्ये डालडा मिसळण्याचे उद्योग सुरू आहेत. चहाच्या पावडरीमध्ये लाकडाचा भुसा किंवा वापरून टाकून दिलेली पावडर मिसळण्याचे प्रकार घडत आहेत. बेसणच्या पिठात भलतेच कसलेतरी पीठ मिसळलेले आढळून येत आहे. वेगवेगळ्या कडधान्यांना आणि डाळींना कृत्रिम रंग देवून त्या आकर्षक बनविल्या जाताना दिसतात. तयार मिरची पावडरमध्ये अनेकवेळा चक्क लाकडाचा भुसा आणि माती मिसळण्यासारखे प्रकार घडत आहेत.

फरसाणसारख्या तळीव पदार्थांना खुसखुशीतपणा येण्यासाठी त्यामध्ये चक्क कपडे धुण्याचा सोडा वापरण्याच्या घटना आढळून येत आहेत. भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गेल्यानंतर ग्राहकाचे लक्ष असते ते ताज्या भाज्यांवर, मात्र आपण घेतलेली भाजी खरंच ताजी असेल याची खात्री देता येत नाही. कारण हिरव्या मिरच्या, पालेभाज्या, फळभाज्या या नेहमी ताज्यातवान्या दिसण्यासाठी  ‘मेलॅचिट ग्रीन’ या रासायनिक पदार्थाचा वापर करण्यात येतो. या रसायनाच्या पाण्यात पालेभाज्या आणि फळभाज्या बुडवून ठेवल्या की दिवसभर हिरव्यागार आणि ताज्या दिसतात. यातील धोकादायक बाब म्हणजे हे जे काही मेलॅचिट ग्रीन नावाचे केमिकल आहे, ते आहारात आल्यास कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. ही भेसळ ओळखण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अशा भाजीवर पांढरा कपडा फिरविल्यास कपड्याला हिरवा रंग लागतो किंवा अशा भाज्या काही काळ पाण्यात बुडवून ठेवल्यास पाणी किंचित हिरव्या रंगाचे होते.

धान्य अथवा भाजीपाल्यामध्ये होणारी भेसळ ही प्रामुख्याने व्यापारी वर्गाकडून होते. त्यामुळे धान्य किंवा भाजीपाला केंव्हाही थेट शेतकर्‍यांकडून खरेदी करणे ग्राहकांच्या हिताचे ठरते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खाद्य पदार्थांमध्ये नेमकी कशी भेसळ होते, ते खाल्ल्यानंतर शरिरावर काय विपरीत परिणाम होतात, याची माहितीसुध्दा सर्वसामान्य नागरिकांनी करून घेण्याची गरज आहे. आजकाल शहरांपासून ते पार खेड्यापाड्यांपर्यंत सर्वत्र ‘चायनीज फास्टफूड’ पदार्थांची चांगलीच चलती आहे. हे चायनीज पदार्थ चवीलाही मस्त लागतात. मात्र या चायनीज पदार्थांमध्ये मसाला म्हणून जे जे काही पदार्थ वापरले जातात, त्यातील बहुतांश पदार्थ हे वेगवेगळ्या स्वरूपाची रसायने आहेत आणि ती शरिराला अत्यंत घातक आहेत.