Mon, Aug 19, 2019 15:18होमपेज › Sangli › दुष्काळाच्या झारीत बसलाय प्रशासनाचा शुक्राचार्य 

दुष्काळाच्या झारीत बसलाय प्रशासनाचा शुक्राचार्य 

Published On: May 16 2019 2:11AM | Last Updated: May 16 2019 2:11AM
सांगली : मोहन यादव 

दुष्काळी तालुक्यातील तलाव सिंचन योजनांद्वारे भरण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. छावण्या व टँकरना मंजुरी देताना तांत्रिक कारणांचा बागलबुवा केला जात असून याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या सिंचन योजनांद्वारे पूर्व भागातील तलाव भरून घेतले तर दुष्काळाची तीव्रता  60 ते 70 टक्के कमी होऊ शकते. पिण्याच्या तसेच जनवारांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. शिवाय, काही प्रमाणात चार्‍याची उपलब्धता होऊ शकते.

यासाठी गेल्या महिनाभरापासून  शेतकरी संघटना आंदोलने करीत आहे. प्रशासन,  शासनाला निवेदने दिली जात आहेत. परंतु, शासन व प्रशासन मात्र हातावर हात ठेवून गप्प आहे. दुष्काळी निवारणाच्या उपाययोजना करण्यात यंत्रणेकडून अक्षम्य ढिलाई केली जात आहे.  ‘आधी वीज बिलाचे पैसे भरा, मग पाणी सोडू, अन्यथा एक थेंबही मिळणार नाही’, अशी तंबी अधिकारी देत आहेत. छावण्या मंजूर करण्यासाठी जाचक निकष लावले जात आहेत. टँकर लॉबीच्या भल्यासाठी शासकीय टँकरच्या खेपा मंजूर केल्या जात नाहीत. सर्वच पक्षांचे नेते याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. प्रामुख्याने जत तालुक्यातील संख, दोड्डा नाला, तिप्पेहळ्ळी, तिकोंडी 1 व 2, दरीबडची, भिवर्गी, सोरडी, सिद्धनाथ, पांडोझरी, गुड्डापूर यासह अन्य तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरणे  शक्य आहे.  परंतु, केवळ पाहणी  करण्याशिवाय काहीही होताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे मोठे हाल सुरू आहेत.  

कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी नदीवरील 14 बंधारे भरले, तर दोन्ही काठांवरील 14 गावांतील हजारो लोकांचा पाणी प्रश्‍न मिटू शकतो. बसप्पावाडी, रायवाडी, दुधेभावी, लंगरपेठ, घोरपडी, जाखापूर, मोरगाव, नांगोळे, लांडगेवाडी, बंडगरवाडी यासह अन्य तलाव टेंभू व म्हैसाळच्या कालव्यांद्वारे भरण्याची आवश्यकता आहे. तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी, अंजनी, पेड, पुणदी, लोढेे या तलावात आरफळ व टेंभूच्या कालव्यातून पाणी  येणे शक्य आहे. काही तलावांत  सायफनने पाणी येत असतानाही प्रशासनाची मात्र इच्छाशक्‍ती  अजिबात दिसत नाही. शासनाचे आदेश नसल्याचे कारण पुढे केले 
जात आहे. वास्तविक प्रशासनाने याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल देणे आवश्यक आहे. मात्र, केवळ कागदी घोडे नाचविण्याशिवाय काहीही होत नाही. 

आटपाडी तालुक्यात दुष्काळाचे चटके मोठे जाणवत असल्याने या तालुक्यातील मोठा असलेला  राजेवाडी तलाव उरमोडीतून भरून घेण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. आटपाडी तलावात परिसरातील डाळिंब बागायतदार शेतकर्‍यांनी पैसे दिल्याने 50 टक्केच्या आसपास पाणीसाठा  आहे. पण  हा तलाव पूर्ण भरण्याची गरज आहे. दिघंची, गोरडवाडी, विभुतवाडी, महाडिकवाडी, कामत, शेटफळे, निंबवडे, वलवण, जांभुळणी, घाणंद हे तलाव टेंभू योजनेद्वारे भरल्यास तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता कमी होईल.  

खानापूर तालुक्यातील ढवळेश्‍वर, वाळूज, वेजेगाव या तलावांत  टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या टेस्टिंगसाठी किरकोळ पाणी सोडले आहे. आळसंद तलावात ताकारी योजनेच्या सुरवातीलाच येत असल्याने येथे   पाणीसाठा  होतो. पण तो पुरेसा  ठरत नाही. हे  सर्व तलाव भरायचे असतील तर आता  रोख रक्‍कम भरावी लागेल, असे प्रशासनाने  सांगितले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची होरपळ सुरु आहे. 

मिरज तालुक्यातील पूर्व भागात म्हैसाळचे पाणी कालवे आहेत. पण तासाला एक हजार रुपये याप्रमाणे पैसे दिले तरच पाणी देतो, असे अधिकारी सांगतात. त्यामुळे  या परिसरातील अनेक शेतकरी एकत्र  येऊन  80 हजार भरतात, त्यानंतर त्यांना  पोटकालव्याद्वारे  8 तास  जेमतेम पाणी सोडले जाते. आरग, लिंगनूर, जानराववाडी, भोसे, कळंबी, बेडग या तलावात पाणी कमी आहे. हे तलाव  भरण्याची मागणी असतानाही या भागातील नेते याकडे दुर्लक्ष करीत आहेत.