Thu, Apr 25, 2019 15:35होमपेज › Sangli › सेंद्रिय शेतीबाबत प्रशासन उदासीन

सेंद्रिय शेतीबाबत प्रशासन उदासीन

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 8:39PMसांगली : प्रतिनिधी

रासायनिक खते, औषधाचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने परदेशात आणि इतर राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जागृती होत आहे. मात्र जिल्ह्यात सेंद्रिय शेतीबाबत उदासिनता आहे. सेंद्रिय शेती करणार्‍या केवळ 1 हजार 79 शेतकर्‍यांची नोंद कृषी विभागाकडे आहे. प्रशासन आणि कृषी विभागाच्या उदासिनतेमुळे ही स्थिती झाली  आहे. दरम्यान, रासायनिक खतांच्या अतीवापरामुळे क्षारपड जमिनीचे क्षेत्र आणि रुग्णांची संख्या वाढत आहे.  

वाढत्या लोकसंख्येला अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी आणि एकरी उत्पादन वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर होतो आहे. आता मात्र त्याचे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. एकाबाजूला क्षारपड जमिनीचे क्षेत्र  वाढत असताना मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्याची दखल प्रगत राष्ट्रांनी घेतली आहे.  पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातून निर्यात केलेली द्राक्षे युरोपीय देशांनी कीटकनाशकाचे अंश आढळल्याने नाकारली. अगदी त्यांच्या समुद्रातही ही द्राक्षे टाकू दिली नाहीत. कारण ती खाल्ल्याने कीटकनाशकामुळे मासेे प्रदूषित होतील, असे त्यांचे मत होते. एवढी जागृती त्या ठिकाणी आहे. त्याची दखल घेऊन आपल्याकडे बदल केले जात आहेत. मात्र ही काळजी केवळ निर्यातीसाठीच्या शेतीमालासाठी घेतली जात आहे. स्थानिक बाजारात येणार्‍या शेतीमालावर मात्र कोणतेही नियंत्रण, तपासणी होताना दिसत नाही. 

सेंद्रिय शेतीची जागृती करण्यासाठी कृषी खात्यात स्वतंत्र विभाग आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर आहे. पैकी निव्वळ पिकाखालील क्षेत्र हे  5 लाख 85 हजार 700 हेक्टर आहे. एकूण शेतकरी संख्या 5 लाख 35 हजार आहे. केवळ 1 हजार 79 शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याची नोंद आहे.  सेंद्रिय शेतीमध्ये स्थानिक गोष्टींचा आणि  पुनर्वापर करण्याजोग्या वस्तूंचा वापर, शेतीवर अवलंबून असणार्‍या  जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क  देणे अपेक्षित आहे.

सेंद्रिय खताच्या नावाखाली शेतकर्‍यांची लूट

सेंद्रिय खताला मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. त्यामुळे सेंद्रिय खताच्या नावाखाली अनेक कंपन्याकडून शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. सेंद्रिय खताच्या नावाखाली शेतकर्‍यांना पांढरी माती काही कृषी सेवा केंद्रामार्फत दिली जात आहे. त्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे. 

सेंद्रिय शेतमालाचे अपुरी मार्केटिंग यंत्रणा

प्रगत देशात सेंद्रिय शेतीमालास बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेंद्रिय प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) आणि नियमावली आहे. सर्वसाधारणप्रमाणे, सेंद्रिय अन्नाच्या उत्पादनाशी थेट संबंध असलेल्या कोणत्याही व्यवसायाला  प्रमाणपत्र  देण्यात येते. आपल्याकडे मात्र याचा अभाव आहे.