Thu, Jul 18, 2019 16:51होमपेज › Sangli › सद्भावना रॅलीतून समतेचा संदेश

सद्भावना रॅलीतून समतेचा संदेश

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 8:23PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जात, धर्म, पद, पक्ष आदी मतभेद बाजूला ठेवत समतेचा, बंधुभावाचा संदेश देत आज सांगलीत हजारोजण रस्त्यावर उतरले. समता आणि एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे  काढण्यात आलेल्या या रॅलीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह खासदार, आमदार, नगरसेवक, विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

भीमा- कोरेगाव येथे दंगलसद‍ृष्य स्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचे पडसाद सांगलीतही उमटले होते.  त्यानंतर विविध संघटनांमध्ये  आरोप- प्रत्यारोप झाले. मोर्चे निघाले. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन या रॅलीचे आयोजन केलेे. रविवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच कर्मवीर चौकात लोक जमा होण्यास सुरुवात झाली. आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून साडेनऊच्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, खासदार अमर साबळे, सुमनताई पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, महापौर  हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, सांगली कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्‍त रविंद्र खेबूडकर, उपायुक्‍त सुनील पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे दीपक शिंदे, बापूसाहेब पुजारी, उरूण-इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, किशोर जामदार, सर्वपक्षीय कृती समितीचे समीत कदम, सतीश साखळकर, श्रीकांत शिंदे, मुन्ना कुरणे, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, माजी अध्यक्ष मनोहर सारडा, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे विनायक शेटे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. 

कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून निघालेली ही रॅली राममंदिर चौक - पंचमुखी मारुती रस्ता- श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय- महापालिका- राजवाडा चौक- स्टेशन चौक या मार्गावरून साडेदहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आली.  

या रॅलीत अग्रभागी पोलिस बँड होता. तिरंगा ध्वज, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी होते. त्यानंतर मुली, महिला आणि नागरिक या क्रमाने सहभाग होता. माजी सैनिक वसतिगृहातील विद्यार्थी फेटा बांधून ढोल आणि झांजपथकासह सहभागी झाले होते. 

रॅलीच्या मार्गावर आणि स्टेडियमवर ठिक-ठिकाणी पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. आठ  फिरती स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. या खेरीज तीन रुग्णवाहिका, 11 फायर ब्रिगेडच्या गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. मिरजेकडून येणार्‍या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था मार्केट यार्ड, इस्लामपूरकडून येणार्‍या वाहनांसाठी इमॅन्युअल इंग्लिश स्कूलचे मैदानावर पार्किंग व्यवस्था केली होती.  प्रत्येक शाळेची जबाबदारी एका तहसीलदारांकडे देण्यात आली होती. स्वयंसेवकांचा सहभाग होता.

भारतमातेचा एकच जयघोष 

रॅलीच्या मार्गावर आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमवर जय हिंद, भारत माता की जय आदी समता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणांचा एकच जयघोष सुरू होता. विशेषत: विद्यार्थ्यांत घोषणा देण्यासाठी उत्साह होता. त्या शिवाय समतेचा संदेश देणारा पोवाडा सुरू असल्याने सर्वत्र देशभक्तीपर वातावारण तयार झाले होते. 

इस्लामपूर, मिरज येथील विद्यार्थ्यांचाही सहभाग

एकता रॅलीसाठी सांगलीतील विविध शाळांबरोबरच मिरज येथील गुलाबराव पाटील शिक्षण संकुल, इस्लामपूरच्या प्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांना ने- आण  करण्यासाठी वाहनांची खास व्यवस्था करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. या उपक्रमांबद्दल त्यांच्यात कुतूहल होते. 

जिल्हा प्रशासनाकडून नेटके नियोजन

समतेचा संदेश देणारी सद्भावना रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठ दिवसापासून जोरदार तयारी सुरु होती. स्वतः जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आदींसह अधिकारी, कर्मचारी  दिवस-रात्र झटत होते. 

पोलिस बंदोबस्त आणि सुरळीत वाहतूक

रॅलीच्या मार्गावर आणि समारोप होणार्‍या स्टेडियमवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये,  यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  रॅलीच्या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पर्यायी मार्गावर वळविण्यात आली होती.  यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती. रॅली आणि स्टेडियमवर दोन ड्रोन आणि 37 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर होती.