Sat, Jul 20, 2019 12:54होमपेज › Sangli › निवडणूक व्यवस्थेसाठी प्रशासनाची मॅरेथॉन

निवडणूक व्यवस्थेसाठी प्रशासनाची मॅरेथॉन

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:49AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी आता यंत्रणेची मॅरेथॉन सुरू झाली आहे. याअंतर्गत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी बुधवारी 18 निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकार्‍यांची नियुक्‍ती केली. 

प्रभागवार सहा तर आचारसंहिता, लेखा व समन्वय अशा तीन कक्षांसाठी हे अधिकारी काम करणार आहेत. यासाठी नऊ कक्ष उभारणी तसेच ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँगरूम उभारणीसाठी इमारतींची पाहणी केली. 

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. त्यानुसार ही निवडणूक पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशाने यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत श्री. खेबुडकर यांनी आज अधिकार्‍यांच्या नियुक्‍तीसह व्यवस्थेसाठी शहरभर दौरा केला. 

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण 20 प्रभागांसाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 6 सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्‍ती केली. त्यांना प्रत्येकी दोन सहाय्यक अधिकारी देण्यात येणार आहेत. त्याचीही तयारी सुरू केली आहे. तसेच आचारसंहिता कक्ष, लेखा व खर्च नियंत्रण कक्ष, समन्यय व निवडणूक व्यवस्थापन अशा  कक्षांसाठीही तीन स्वतंत्र अधिकारी तसेच सहाय्यक अधिकार्‍यांची  खेबुडकर यांनी नियुक्‍ती केली.

खेबुडकर  म्हणाले, महापालिका निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी  आदर्श आचारसंहिता प्रणाली अवलंबण्यात येणार आहे. याअंतर्गत लवकरच या अधिकार्‍यांचे त्या-त्या प्रभागात कक्ष  स्थापन होतील.  यासाठी तीनही शहरात इमारतींची पाहणी केली. यामुळे तेथे इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सोय होईल. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ टाळता येईल. 

खेबुडकर म्हणाले,  ईव्हीएम मशीन  निवडणुकीपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षित कक्षांचीही पाहणी केली. हे सर्व काम पारदर्शीपणे व्हावे यासाठीच संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ते निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. ही पाहणी करताना उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

खेबुडकर म्हणाले,  सर्व कक्षांची उभारणी करण्यासाठी मुख्यालयासह कुपवाड आणि मिरजेतील इमारतीचींही पाहणी केली. त्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांसाठी उभारण्यात येणार्‍या कक्षांचीही पाहणी केली. दरम्यान पालिकेच्या मुख्यालयात नगरसचिवांच्या कार्यालयात आजपासून निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या निश्‍चितेचे काम सुरू आहे. तीन शहरात सुमारे 600 वर मतदान केंद्रे असतील. त्यासाठीही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्या केंद्रांमध्ये दिवे, पाणी, स्वच्छतागृहे आदिंची सोय करण्याचे काम सुरू आहे. ते म्हणाले, संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. सोबतच ऑनलाईन अर्जभरणा करण्यासाठी सायबर कॅफे, ई-महासेवा केंद्रांनाही प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्यापासून ते मतदान, मतमोजणीसह सर्व प्रक्रियेसाठी आता युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.