Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Sangli › पथदिव्यांची तोडलेली वीज तात्काळ जोडा

पथदिव्यांची तोडलेली वीज तात्काळ जोडा

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 13 2018 12:20AMसांगली : प्रतिनिधी

शासनस्तरावर थकीत वीज बिलामुळे ‘महावितरण’ने जिल्ह्यात अनेक गावांमधील पथदिव्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्याकडे जिल्हा परिषदेेचे अध्यक्ष संंग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. त्यावर फडणवीस यांनी तातडीने ‘प्रकाशगड’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दूरध्वनी करत तोडलेली वीज तात्काळ जोडण्याचे आदेश दिले.

ग्रामपंचायतींमार्फत गावातील पथदिव्याची व्यवस्था केली जाते. पथदिव्यांचे संपूर्ण वीज बिल शासनस्तरावरून भरले जाते. मात्र हे वीज बिल शासनाने भरलेले नाही. 

वीज बिल प्रलंबित राहिल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पथदिव्यांची वीज तोडण्याचे आदेश व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिले होते. त्यानुसार सांगली जिल्ह्यात अनेक गावांमधील पथदिव्यांची वीज महावितरणने तोडली. वीज कनेक्शन तोडण्याचे सत्र सुरूच होते. त्यामुळे अनेक गावातील रस्ते रात्रीच्या वेळी अंधारात आहेत. 

अनेक गावांच्या सरपंचांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे संपर्क साधला होता. देशमुख यांनी ही बाब गांभीर्याने घेत सोमवारी इस्लामपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणली. फडणवीस यांनी तातडीने ‘प्रकाशगड’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दूरध्वनी लावत पथदिव्यांची तोडलेली वीज तातडीने जोडा, असे आदेश दिल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी दिली. 

दरम्यान, देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशीही संपर्क साधून प्रलंबित वीज बिलाकडे लक्ष वेधले होते. शासनाच्या वित्त विभागाकडून ही रक्कम महावितरणकडे वर्ग केली जात असते. त्यासंदर्भात गतीने कार्यवाही होईल, असेही मुंडे यांनी देशमुख यांना सांगितले .