Sun, May 26, 2019 17:37होमपेज › Sangli › अकरावीसाठी जादा शुल्क घेतल्यास कारवाई

अकरावीसाठी जादा शुल्क घेतल्यास कारवाई

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 8:31PMसांगली : प्रतिनिधी

अकरावी प्रवेशासाठी जादा शुल्क घेतल्यास पहिल्या अपराधासाठी 1 ते 5 लाख रुपये दंड, दुसर्‍या अपराधासाठी 2 ते 10 लाख दंड किंवा तीन ते सहा महिने कारावासाची तरतूद आहे. प्रवेश प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास शाळांवर कारवाई केली जाईल, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या बैठकित सांगितले. अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शुक्रवारी सांगलीत मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात मुख्याध्यापक, प्राचार्यांची बैठक घेतली. शिक्षणाधिकारी महेश चोथे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक माधुरी गुरव यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. 

चोथे म्हणाले, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमानुसार शाळांची शुल्क निश्‍चितीची पद्धत स्पष्टपणे नमूद केलेली आहे. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा/महाविद्यालयानी दि. 15 ऑगस्टपर्यंत शिक्षक-पालक संघ स्थापन करून पहिली बैठक घ्यावी. दि. 30 ऑगस्टपर्यंत कार्यकारी समितीची स्थापना व शुल्क निश्‍चिती करून शिक्षणाधिकारी यांना कळवणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशासंदर्भात माहिती पुस्तिकेवर अर्जाची किंमत, शाळेचा शिक्का, विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्कची पावती देताना त्यावर पावती क्रमांक, शिक्का व स्वाक्षरी आवश्यक आहे.

अकरावीप्रवेशासाठी सर्व शाळा/कॉलेजनी शासनाच्या नियमाचे पालन करावे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल. नफेखोरीच्यादृष्टीने शैक्षणिक शुल्क निश्‍चिती करू नये. शिक्षक-पालक व कार्यकारी समितीने मान्य केलेलेे शुल्क विद्यार्थ्यांकडून घ्यावे. निश्‍चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेतल्यास 1 ते 5 लाखांपर्यंत दंड आहे. दुसर्‍या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी 2 ते 10 लाख रुपये किंवा तीन ते सहा महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे, असे चोथे यांनी सांगितले. शासनाचा लाभ घेत असलेल्या कोणत्याही शिक्षकाला खासगी शिकवणी घेता येणार नाही, असेही चोथे यांनी सांगितले.