Sat, Jul 20, 2019 15:26होमपेज › Sangli › स्टिंग ऑपरेशन करूनही कारवाई नाही

स्टिंग ऑपरेशन करूनही कारवाई नाही

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:13PMसांगली : प्रतिनिधी

मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी मुलींच्या वसतिगृहातील गैरप्रकाराबाबत 2016 मध्ये स्टिंग ऑपरेशन केले होते. त्याचे फोटो त्यांनीच सर्वत्र व्हायरल केले. शिवाय दोषींवर कारवाईही केली नाही. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरजेच्या आधार महिला विकास संस्थेतर्फे पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

याबाबत अधीक्षक शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रविणा हेटकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलींच्या वसतिगृहात दि. 21 डिसेंबर 2016 रोजी अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी पहाटे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावेळी त्यांना वसतिगृहात अनुचित प्रकार निदर्शनास आले होते. मात्र  त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. शिवाय  तेथील फोटो व्हायरल केले.  वसतिगृहातील अनुचित प्रकाराबाबत वरीष्ठांना किंवा पोलिसांना का कळविले नाही असा प्रश्‍नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अधिष्ठातांनी फोटो व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.  यावेळी अ‍ॅड. हेटकाळे, शारदा गुप्ता, कांचन गायकवाड आदींसह आधार महिला विकास संस्थेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

याबाबत डॉ. सापळे म्हणाल्या, माझ्याविरोधात नेमकी कोणती तक्रार केली आहे याची कल्पना नाही. शिवाय पोलिसांनीही माझ्याकडे तक्रारीबाबत कोणतीही चौकशी किंवा विचारणा केलेली नाही. मी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार घेतल्यापासून कोणतेही स्टिंग ऑपरेशन केलेले नाही. शासकीय अधिकार्‍यांनी असे ऑपरेशन करण्याची गरज नाही तसेच ते त्यांनी करू नये असे मला वाटते. माझ्याबाबत केलेल्या तक्रारीबाबत माहिती नसल्याने त्याबाबत अधिक बोलणे उचित नाही.