Thu, Aug 22, 2019 03:52होमपेज › Sangli › कामटेसह ७ संशयितांवर आरोप निश्‍चित

कामटेसह ७ संशयितांवर आरोप निश्‍चित

Published On: Feb 12 2019 1:09AM | Last Updated: Feb 12 2019 12:29AM
सांगली : वार्ताहर

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी युवराज कामटेसह सात जणांवर दहा आरोप सोमवारी निश्‍चित करण्यात आले. संशयित आरोपींनी आरोपपत्र निश्‍चिती अर्जावर (प्ली रेकॉर्डिंग) सही करण्यास नकार दिला; मात्र न्यायालयाने समज दिल्यानंतर त्यांनी सही केली. आता पुढील सुनावणी 26 फेबु्रवारी रोजी निश्‍चित करण्यात आली.

जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी संशयितांवर आरोप निश्‍चित करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने संशयित आरोपींना “तुमच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का?’’ असे विचारले, त्यावेळी संशयितांनी आरोप मान्य नाहीत, असे सांगितले. 

त्यानंतर संशयितांना आरोप निश्‍चिती करण्याचा अर्ज देण्यात आला. सुरुवातीला संशयितांनी त्या अर्जावर सही करण्यास नकार दिला. बर्‍याच वेळ वाया गेल्याने न्यायालयाने त्यांना समज दिल्यानंतर संशयितांनी अर्जावर सह्या केल्या. 

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह कावळेसाद (आंबोली) येथे नेऊन जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्यावर खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणाची न्या. सौ. सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे यालाही अटक करण्यात आली होती. मात्र या खटल्यातून त्याचे नाव वगळण्यात आले आहे.  मात्र, कांबळे वगळता उर्वरित सहाजणांचा कोथळे खून प्रकरणात प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याने त्यांच्यावर प्रस्तावित दहा आरोप निश्‍चित करण्याची मागणी अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयासमोर मंगळवारी केली.

याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली. कामटेसह अनिल लाड, अरूण टोणे यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर नष्ट करून पुरावा नष्ट केल्याचाही आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. 

याप्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषणने (सीआयडी) करुन दि. 5 फेब्रुवारी 2018 ला न्यायालयात संशयितांविरुध्द दोषारोपपत्र सादर केले. या गुन्ह्यातील काही संशयितांनी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते.