Wed, Jul 24, 2019 12:17होमपेज › Sangli › फरार गुन्हेगार इस्लामपुरात जेरबंद

फरार गुन्हेगार इस्लामपुरात जेरबंद

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 8:55PMइस्लामपूर : वार्ताहर

घरफोड्या, चोर्‍या, मारामार्‍या, खुनाचे प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात हवा असलेला व गेली 5 वर्षे फरार असलेल्या बंजारा बिरज्या पवार (रा. साखराळे, ता.वाळवा) या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात इस्लामपूर पोलिसांना शनिवारी रात्री यश आले. येथील मार्केट यार्ड परिसरात वहिनीलाच चाकूने भोसकताना तो पोलिसांच्या तावडीत सापडला. या मारामारीत बंजारा, त्याची वहिनी व एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला.

गेले काही दिवस इस्लामपूर पोलिस बंजाराच्या अटकेसाठी प्रयत्नशील होते. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या पथकाच्या तावडीतूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसरातील दत्त मंदिरासमोर बंजारा याने आपली वहिनी रिटा दैवत पवार हिच्यावर खुनी हल्‍ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी नागरिकांनी त्याला पकडून जबर मारहाण केली होती. 

याची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक गणेशप्रसाद भरते, हवलदार कृष्णा पवार, जितेंद्र थोरात, अनुज पाटील, प्रकाश पवार, अमोल शिंदे, गणेश शेळके यांनी घटनास्थळी धाव घेवून बंजाराला जेरबंद केले. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जितेंद्र थोरात यांच्या हाताला चाकू लागून दुखापत झाली. जखमी बंजारा याला अटक करून उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले आहे. 

सन 2007 पासून गुन्हे...

बंजारा याच्यावर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात सन 2007 पासून कलम 457, 380, 379, 326, 324, 454, 461 चे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. सन 2013 पासून तो फरार होता. अखेर मारामारीच्या प्रकरणातच तो पोलिसांच्या तावडीत सापडला.