Mon, Nov 19, 2018 08:25होमपेज › Sangli › बलात्काराबद्दल कुपवाडच्या तरुणाला 12 वर्षे सक्तमजुरी

बलात्काराबद्दल कुपवाडच्या तरुणाला 12 वर्षे सक्तमजुरी

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:02AMसांगली : वार्ताहर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी विजय मधुकर गुरव (वय 22, रा. कुपवाड, मूळ गाव, शाहूवाडी जि. कोल्हापूर) याला 12 वर्षे सक्तमजुरी , 25 हजार रुपये दंडाची व त्याचा साथीदार व रतन दत्ता माने (वय 20, रा. वडरगल्‍ली, सांगली ) याला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे  सौ. आरती साटवीलकर- देशपांडे यांनी काम पाहिले. 

विजय गुरव हा विश्रामबाग येथे पोलिस असल्याची बतावणी करून  कुपवाड येथे भाड्याच्या घरात राहत होता. पिडीत मुलगी सतत फोनवर बोलते म्हणून तिचे कुटुंबिय तिला रागावले होते. म्हणून दि. 19 फेबु्रवारी 2014 रोजी ती घरातून बाहेर पडली. त्यावेळी  गुरव व माने हे दोन्ही आरोपी मोटारसायकलवरुन तिच्याजवळ गेले व त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी “मला उपळावीला जायचे आहे” असे तिने सांगितले. त्यावर आता रात्र झाली आहे. सकाळी नेऊन सोडतो असे सांगून  त्या दोघांनी त्या  मुलीला मोटारसायकलवर  बसवून सांगली बसस्थानकात येथे नेले. नंतर ‘आता उपळावीला बस नाही सकाळी बस स्टँडवर आणून सोडतो’, असे सांगून तिला कुपवाड येथे  गुरवच्या खोलीत नेले. त्यावेळी गुरव याने त्या मुलीला धाक दाखवून  बलात्कार केला. दुसर्‍या दिवशी आरोपींची नजर चुकवून पिडीत मुलगी तिच्या घरी गेली व तिच्या कुटुंबियांना घडलेली घटना सांगितली. पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरव व रतन माने यांच्या विरुध्द फिर्याद दिली.

 तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी तपास करुन त्या दोघांच्या विरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 376, 171, 363, 366(अ), 417,  109 व  लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षक कायदा 2012 (फोक्सो) मधील कलम 4 अन्वये आरोपप दाखल केले. सरकार पक्षाला हवालदार वंदना मिसाळ व रमा डांगे यांनी मदत केली. या खटल्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलगी, तिचे वडील व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने शिक्षा सुनावली. विजय गुरव याच्यावर खून, मारामारी असे अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. 

Tags : rape, youth, 12 year, servitude, Sangli