Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Sangli › विभाजनाशिवाय विकास नाही

विभाजनाशिवाय विकास नाही

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 9:02PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

वाढत्या शहरीकरणाचे आव्हान महापालिकेच्या अपुर्‍या यंत्रणेला पेलणे अशक्य ठरले आहे. सुविधांचे आव्हान व करवसुलीही 100 टक्के होत नाही. त्यामुळे वार्षिक अंदाजपत्रकांचा फुगा नेहमीच फुटत आला आहे. कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी समतोल विकास होणे शक्य नाही. यावर दोन्ही स्वतंत्र महापालिका हाच पर्याय आहे. याबाबत मान्यवरांच्या प्रतिक्रिया...

सत्तेचे विकेंद्रीकरण हाच पर्याय : जयश्री पाटील

तीन शहरांचा 118 चौरस कि.मी. विस्तार पाहता गेल्या 19 वर्षांत हे शिवधनुष्य प्रशासनाच्या माध्यमातून पेलता आले नाही. अपुरे उत्पन्न असल्याने गुंठेवारीत विस्तारलेल्या शहराला न्याय देणे अशक्यप्राय आहे. शासनाकडूनही त्या तुलनेत अनुदान नाही. महापालिका विभाजन करून सुसूत्रता पद्धतीने विकास शक्य आहे.  

चूक सुधारण्याची संधी : हाफिज धत्तुरे

तीन शहरांची महापालिका करण्याला आम्ही स्थापनेवेळीच विरोध केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे मी व माजी आमदार दिनकर पाटील यांनी तक्रार केली, जनआंदोलन उभारले. पण यश आले नाही. आता स्वतंत्र महापालिका करून विकासाचे अडथळे दूर होऊ शकतील. चूक सुधारता येईल. 

विभाजनाशिवाय पर्याय नाही : संजय बजाज

तीन शहरांच्या नागरिकांना महापालिका न्याय द्यायला अपुरी पडत आहे. त्यामुळे आता सांगली, मिरज महापालिका विभाजनाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आताच प्लॅनिंग करता येईल, आरोग्य, अधिकारी, आयुक्‍त, सर्वच अधिकार्‍यांना एकाच यंत्रणेवर तीन शहरांचा भार मोठा झाला आहेत. आता लोकसंख्येचा निकषही बसतो. त्यामुळे भविष्यातील 25 वर्षांचेही नियोजन करून दोन्ही महापालिका निर्मितीत तसा विकासाचा आराखडा होऊ शकेल.

विभाजनातून जबाबदारी ठरेल: इद्रिस नायकवडी

महापालिकेच्या कारभारात सांगलीकर नगरसेवक मिरजकरांनी निधी पळविला, मिरज पॅटर्न म्हणून नेहमीच हिणवत आले आहेत. वास्तविक विकासाबाबत त्या नगरसेवकांची तेवढी तळमळ नसते, हे त्यांचे अपयश आहे. शिवाय तीनही शहरांच्या विकासाला महापालिकेचे उत्तर समाधानकारक नाही. परिणामी स्वतंत्र महापालिका झाल्यास चांगल्या-वाईटाला जबाबदारी त्या-त्या शहर, लोकप्रतिनिधींची राहील. विकासासाठी शासनाने तसे करावे.

विभाजन गरजेचे : राजेश नाईक 

दोन्ही शहरांची संस्कृती वेगळी आहे. त्यानुसार विकासाच्या गरजाही वेगळ्या आहेत. गेल्या 19 वर्षांत तीन शहरांना समान न्याय मिळाला नाही. आता विभाजनाशिवाय ते शक्यही नाही.  दोन महापालिका झाल्या तर विकास चांगला होईल. 

सांगलीला संधी मिळेल : संतोष पाटील

सांगली, मिरज स्वतंत्र महापालिका ही काळाची गरज आहे. मिरजेत वारंवार निवडून येणारे मातब्बर नगरसेवक निधी पळवितात. सांगलीकर वारंवार नगरसेवकांना संधी देत नसल्याने या मातब्बरांसमोर फिके पडतात. वास्तविक करवसुली सांगलीची, मात्र अधिक निधी मिरजेला हे सुरूच आहे. त्यामुळे विकास खुंटलेला आहे. त्यासाठीच नियोजनबद्ध विकास करू शकलो नाही.  

विकासाला चालना मिळेल : प्रशांत मजलेकर

सांगली, मिरजेची भौगोलिक रचना वेगळी आहे. सांगलीत व्यापारपेठांचे शहर आहे. मिरज रेल्वे जंक्शन, कर्नाटक संस्कृती, वैद्यकीय हब आहे.  दोन संस्कृती एकत्र वाढायला संधी नाही. त्यामुळे कुपवाड सांगलीत घेऊन माधवनगर, अंकली, धामणीसह  महापालिका केली तर चांगला विकास होईल. त्यासाठी विकास आराखडा होऊ शकतो. दोन्ही शहरांना इस्लामपूर, नागपूर महामार्ग जोडले आहेत. त्यादृष्टीने दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल. त्याबरोबरच राजकीय हस्तक्षेपही टळेल.

लोकसंख्येनुसार विभाजन गरजेचे : शेखर इनामदार

गेल्या 19 वर्षांत तीनही शहरे मोठी झाली. लोकसंख्येत प्रचंड वाढ असून, विस्तार आता एका महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे दोन महापालिका स्वतंत्र झाल्या तर विकासाला चालना मिळेल. सांगली, मिरजेच्या महापालिकांच्या माध्यमातून शासन, प्रशासनाला दोन्ही शहरांत जास्तीत- जास्त विकास होईल.

विभाजन हाच महामार्ग :  रामभाऊ घोडके

मिरज वगळून सांगली, कुपवाड स्वतंत्र महापालिका करावी. त्यासाठी धामणी, हरिपूर, माधवनगर आदी गावे घेतली तरी चालतील. यातून सांगली, मिरजेचे स्वतंत्र कारभार चालतील. ग्रामीण भागाचाही विकास होईल. किमान 20 वर्षानंतर तर शासनाने निर्णय घ्यावा.

मिरज पॅटर्नला चाप बसेल : दत्तात्रय घाडगे

मिरजकर नगरसेवकांच्या वर्चस्वामुळे तीनही शहरांचा विकास रोखला गेला आहे. त्यामुळे आता सांगली, कुपवाडसह अन्य गावे घेऊन स्वतंत्र महापालिका करावी. मिरजेलाही अन्य गावे जोडून त्यांचे त्यांना ‘राज्य’ द्यावे.  प्रशासनाच्यादृष्टीने विकासाचा सावळा गोंधळ थांबेल. मिरज पॅटर्नला चाप बसेल. विकासाच्यादृष्टीने खरे ते महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.