होमपेज › Sangli › वादळी पावसाने द्राक्षबागायतदार शेतक-यांचे सुमारे २५ कोटीचे नुकसान

वादळी पावसाने द्राक्षबागायतदार शेतक-यांचे सुमारे २५ कोटीचे नुकसान

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 6:41PM



तासगाव : प्रतिनिधी

बुधवार (दि. १६ मे) रात्रीच्या सुमारास वादळी वार्‍यासह झालेल्या पाऊस व तुफान गारपिटीने येळावी व परिसरातील गावांना अक्षरश झोडपून काढले. या गारपिटीच्या तडाख्यात येळावी (ता. तासगाव) येथील द्राक्षबागाचे मोठे नुकसान झाले आहे. यानुकसानीचे कृषि विभागाकडून पंचनामे करण्यात आले. यात द्राक्षबागायतदार शेतक-यांचे सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे यांनी दिली. 

तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, मंडल कृषी अधिकारी आर. आर. खरमाटे, कृषी पर्यवेक्षक सचिन दाभोळे, कृषी सहाय्यक सी. के. पाटील, मंडल अधिकारी रमेश पवार, गावकामगार तलाठी शशिकांत ओमासे यांच्या पथकाने दिवसभर पंचनामे केले. 

याबाबत कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, वादळी वार्‍यासह झालेल्या गारपीटीचा मोठा फटका येळावी येथील  द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना बसला आहे. द्राक्षबागांच्या लागवडीखालील क्षेत्र जवळपास २५० हेक्टर आहे. यापैकी २०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे गारपिटीने नुकसान झाले आहे.  द्राक्षबागांवर कॅनॉपीला गारांचा मारा बसला आहे. यामुळे द्राक्षे येण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एक हेक्टर द्राक्षबागेचे सरासरी वार्षिक उत्पन्न १२ लाख ५० हजार रुपयांच्या आसपास असल्याने येत्या पिक छाटणी हंगामात द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना अंदाजे २५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

घरांचे नुकसान 

वादळी पावसाने येळावी येथील आठ घरांचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी रमेश पवार आणि गावकामगार तलाठी शशिकांत ओमासे यांनी नुकसानीचे पंचनामे केले असून अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनिल ढाले यांनी दिली आहे.

विमा निकष बदलासाठी मोर्चा : महेश खराडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी आज, गुरुवार (दि. १७ मे) येळावी येथे भेट घेऊन द्राक्षबागांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या द्राक्ष पीक विम्याचे निकष बदलण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. सध्याचे निकष बदलून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.