होमपेज › Sangli › कृषी व दुग्धमंत्र्यांच्या पुतळ्याला अभिषेक

कृषी व दुग्धमंत्र्यांच्या पुतळ्याला अभिषेक

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:32PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

दूध संकलन व खरेदी करणार्‍या संस्थांनी दूध दर प्रतिलिटरला 7 ते 10 रुपयांनी कपात केल्याचा निषेध करत  शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषिमंत्री व दुग्धमंत्र्यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी सांगितले की, दूध संकलन व खरेदी करणार्‍या संस्थांनी गाय दुधाला प्रति लिटर दोन रुपये व म्हैशीच्या दुधाला प्रति तीन रुपये लिटर दरवाढ देण्याचे आदेश शासनाने दिले होते. प्रारंभी महिनाभर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर मात्र अशी वाढ देता येणार नाही, असे या संस्थांनी सांगूनही सरकारने काहीच कारवाई केली नाही. याचदरम्यान, दूध संघ व संस्थांनी खरेदीदरात कपात करत गाय दुधाचे दर प्रति लिटरमागे 7 ते 10 रुपयांनी कपात करून ते  17 ते 20 रुपयांवर आणले. याचा फटका शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ‘महानंद’नेही दूध खरेदी दर घटविला आहे. 

सध्या संस्था कमी दराने दूध खरेदी करून त्याची पावडर बनवून उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांकरिता जास्त दराने विक्री करतात. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट होते. संस्थांनी दूध दर जरी घटविले असले तरी विक्रीमध्ये ते कोणत्याही प्रकारचा बदल करीत नाहीत. ‘अमूल’ 27 रुपयांनी दूध खरेदी करते. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडत आहे. खरेदीदार व संस्थांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे दूध खरेदीदारांना गाय दुधाला प्रतिलिटर 27 रुपये देण्यास भाग पाडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

संजय कोले, सुनिल फराटे, रावसाहेब दळवी, अल्लाउद्दीन जमादार, शीतल राजोबा, नवनाथ पोळ, रामचंद्र कणसे, वसंत भिसे, मोहन परमणे, अण्णा पाटील, शंकर कापसे, आप्पासाहेब हरताळे, सदाशिव पाटील आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

मंत्र्यांना दुग्धाभिषेक का चालत नाही?
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दर कपातीच्या निषेधार्थ कृषी व दुग्ध मंत्र्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. यावेळी पोलिसांनी या आंदोलनाला विरोध केला. कार्यकर्ते आक्रमक होऊन आम्ही रस्त्यावर आंदोलन केलेले असताना दुग्धाभिषेकाला विरोध केला जात आहे.  देवाला अभिषेक घातलेला सरकारला चालतो. पण अन्याय करणार्‍या सरकारला दुग्धाभिषेक का चालत नाही, असा सवाल त्यांनी केला.