Sun, Mar 24, 2019 04:45होमपेज › Sangli › बालिका खून तपासासाठी आटपाडीत मोर्चा

बालिका खून तपासासाठी आटपाडीत मोर्चा

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:23PMआटपाडी  ः प्रतिनिधी 

गळवेवाडी (ता.आटपाडी) येथील प्रतीक्षा दादासाहेब गळवे या बालिकेच्या खुनाचा तीन आठवड्या नंतरही तपास न लागल्याच्या निषेधार्थ आज संतप्त गळवे कुटुंबीय, लोणारी समाज सेवा संघ, तसेच विविध संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात आला. पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्‍त करून निषेध केला. आटपाडीकरांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवित शहरात कडकडीत बंद पाळला.

दि. 7 जानेवारीला प्रतीक्षा गळवे घरातून गायब झाली.दि. 8 जानेवारीला घराजवळच्या पडक्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या घटनेचा तपास  तत्काळ सुरू केला.परंतु, या घटनेनंतर तब्बल 22 दिवस झाले तरी प्रतीक्षाचा खुनी अद्याप मोकाटच फिरत आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच्या निषेधार्थ  आटपाडी बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रतीक्षाचे आई-वडील, दैवत काळेल, अनिल देसाई, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, सभापती हर्षवर्धन देशमुख, भारत पाटील, मोहनराव देशमुख, आनंदराव पाटील, हणमंतराव  देशमुख, आप्पासाहेब  काळेल, उमाजी ढेंबरे, गणेश गोडसे, साहेबराव गळवे, दिनकर करांडे, नवनाथ रानगट, हणमंत करांडे व यांच्यासह  सुमारे दोन हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते.

मोर्चानंतर तहसील कार्यालयासमोर सभा झाली. यावेळी पोलिसांकडून तपासात होत असलेल्या दिरंगाईबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या. त्यामुळे तिथे वादावादी झाली. तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देताना बाचाबाची झाली. परिस्थिती तणावपूर्ण झाली.

गीता कारंडे, पायल विभुते,  तनुजा शेजाळ व शालेय मुलींनी ‘पोलिसांना खुनी का सापडत नाही’,असा सवाल केला व ‘प्रतीक्षाचा खुन्याला अटक करा’ अशी मागणी करीत तहसीलदारांना निवेदन दिले. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी  खुन्याला लवकरच अटक करण्याचे आश्‍वासन दिले. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 100टक्के बंद होती. त्यामुळे नेहमी गजबलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. बंदच्या अनुषंगाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.