Mon, Jul 22, 2019 14:16होमपेज › Sangli › ‘एटीएस’चे पथक जिल्ह्यात तळ ठोकून

‘एटीएस’चे पथक जिल्ह्यात तळ ठोकून

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 25 2018 1:17AMसांगली : 

अंधश्रद्धा निर्मृलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी राज्य दहशतवादविरोधी (एसटीएस) पथक सांगली जिल्ह्यात तळ ठोकून आहे, असे समजते. सीबीआयच्या पथकाने गुरुवारी तासगाव येथे छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, एटीएसचे पथकही तासगाव आणि मिरजेत तळ ठोकून आहे. पथकाने या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतील नालासोपार्‍यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडला होता. त्यानंतर काही संशयितांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सांगली जिल्ह्यातील काही जणांची नावे पुढे आल्याचे सांगण्यात आले होते. 

त्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांत एटीएसचे एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित सचिन अंदुरे याच्यापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. शस्त्रसाठ्याप्रकरणी काही संशयित अटकेत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही जणांची नावे पुढे येत आहेत. त्यांच्या चौकशीसाठी एसटीएसचे राज्यभर छापासत्र सुरू आहे.

गुरुवारी सकाळी सीबीआयचे पथक तासगावात दाखल झाले. पथकाने तासगाव शहरासह तालुक्यात छापा टाकला. या छाप्यात दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. स्थानिक पोलिसांची मदत न घेता पथकाने ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली असल्याने त्यांची नावे व कारवाईचा सविस्तर तपशील समजू शकला नाही.  दरम्यान शुक्रवारी एटीएसच्या पथकाने तासगाव येथे काहींची चौकशी केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. तर काही जणांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. या पथकाने  शुक्रवारी मिरजेतही काही जणांकडे चौकशी केल्याचे समजते पण त्याचा तपशील मिळू शकला नाही.