Sun, Mar 24, 2019 16:50होमपेज › Sangli › सांगलीत एकावर खुनीहल्ला

सांगलीत एकावर खुनीहल्ला

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 03 2018 12:23AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील वडर कॉलनीत लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेला वाद मिटविताना एका युवकावर कोयत्याने खुनीहल्ला करण्यात आला. यामध्ये मेहबूब नबीसाब अत्तार (वय 23, रा. मंगळवार बाजार परिसर) जखमी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकऱणी विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

आकाश शैलेश शिंदे, ऋषिकेश वाघमारे (दोघेही रा. वडर कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषिकेश चरणदास जाधव (वय 20) याने फिर्याद दिली आहे. दि. 25 रोजी रात्री लग्नाच्या वरातीत नाचताना रागाने पाहिल्याने ऋषिकेश जाधवसह दोघांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर ऋषिकेशसह साथीदारांनी मारहाण करणार्‍यांच्या घरावर दगडफेक केली.याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या होत्या.  

हा वाद मिटविण्यासाठी शिंदे व वाघमारे यांनी ऋषिकेशला गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडर कॉलनीत बोलाविले होते. त्यावेळी तो महेबूब अत्तार व शंकर ऐवळे यांच्यासोबत मोटारसायकलवरून तेथे गेला. त्यानंतर त्यांची त्या वादाबाबत चर्चा सुरू असताना  पुन्हा वाद झाला. त्यावेळी शिंदे व वाघमारे यांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात मेहबूब अत्तार जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघाही संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.