Sat, Mar 23, 2019 18:56होमपेज › Sangli › शाळा, कॉलेजच्या ‘इंटिग्रेटेड’ लुटीला शासनाचा दणका

शाळा, कॉलेजच्या ‘इंटिग्रेटेड’ लुटीला शासनाचा दणका

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:17PMसांगली : प्रतिनिधी

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात फक्त ‘प्रॅक्टीकल’ (प्रात्यक्षिक) करायचे आणि नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्‍लासमध्ये उपस्थित रहायचे असा प्रकार वाढला आहे. अनेक उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चक्क खासगी शिकवणी वर्गांसोबत ‘सामंजस्य’ करार केलेला आहे. आर्थिक लुटीच्या या ‘इंटिग्रेटेड’ प्रकाराला शासनाने दणका देण्यासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक केली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात समाविष्ट न केलेल्या कोल्हापूर विभागाचाही या योजनेत समावेश गरजेचा आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात व नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्‍लासमध्ये उपस्थित राहतात. त्यासाठी अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी खासगी शिकवणी वर्गाांसोबत सामंजस्य करार केलेला आहे. त्यासंदर्भात शासनाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने सुरू करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. 

पहिल्या टप्प्यात 8 पैकी 5 विभाग

राज्यात शालेय शिक्षण खात्यांतर्गत मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नागपूर हे 8 विभाग आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या 5 विभागातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेण्याचा शासन निर्णय शुक्रवारी (दि. 15 जून) जारी झाला. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर विभागाचाही समावेश करणे  आवश्यक आहे.  अकरावी, बारावीचे वर्ष विद्यार्थी व पालकांच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे असते. इंजिनिअरिंग, मेडिकलला प्रवेश मिळावा यासाठी विज्ञान शाखेचे विद्यार्थी अकरावीपासूनच खासगी क्‍लासची वाट धरत असतात. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी, बारावीच्या वर्गांना उपस्थित न राहता प्रॅक्टीलच्या गुणांसाठी फिल्डींग लावायची आणि खासगी क्‍लासमध्ये शिकायचे, हा फंडा आता चांगलाच रूळला आहे. मात्र अलिकडच्या काही वर्षात एक नविनच फंडा सुरू झाला आहे.

खासगी अनुदानित काही शाळेत शाळेच्या वेळेतच खासगी शिकवणी सुरू असते. त्यामोबदल्यात संबंधित काही शाळांना काही खासगी शिकवणी घेणारे ठराविक रक्कम देतात, अशी तक्रार आहे.   त्याविरोधात तक्रारी झालेल्या आहेत.  सन 2017 मध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनात अशा इंटिग्रेटेड शाळा/कॉलेजचा प्रश्‍न उपस्थित झाला होता.  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. त्यानुसार शासन निर्णय झाला आहे. मात्र ‘बायोमेट्रीक उपस्थिती’चा निर्णय एकाचवेळी राज्यातील सर्व आठही विभागात सुरू होणे आवश्यक आहे. 

सांगली जिल्ह्यात बायोमेट्रीकचे आवाहन: शिक्षणाधिकारी

‘शालेय शिक्षण’च्या शासन निर्णयात पहिल्या टप्प्यातील विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा समावेश नाही. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग हे 5 जिल्हे आहेत. सांगली जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेच्या विद्यार्थी उपस्थितीची व्यवस्था ‘बायामेट्रीक’ पद्धतीने करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी केले आहे.