Wed, May 22, 2019 10:21होमपेज › Sangli › विद्या देणार्‍याचीच झोळी रिकामी; निवृत्तीचं वय आलं तरी पगार नाही(Video)

गोष्ट एका शाळेची : निवृत्तीचं वय आलं तरी पगार नाही (Video)

Published On: Apr 20 2018 4:51PM | Last Updated: Apr 21 2018 4:26PMसांगली : शंकर पवार, पुढारी ऑनलाईन

गेल्या अठरा वर्षांपासून त्यांनी घंटा वाजवल्यानंतर शाळा सुरू होते आणि बंदही... ते दिवसभर शाळेत पडेल काम करतात. शाळेचे विद्यार्थी मोठे झाले. चांगले कलाकार, नोकरदार होऊन त्यांनी नाव कमावलं. परंतु, ते अजूनही तेच काम करतायत अविरतपणे आणि त्यांची दिनचर्याही तशीच झालीय. दिवसा शाळेसाठी राबायचं आणि रात्री आपल्या कुटूंबासाठी पडेल ते काम करायचं. 

त्यांना सुतार काम येतं. दिवसा शाळेत शिपायाचं काम करायचं अन् मिळेल त्या वेळेत सुतारकाम करून प्रपंच हाकायचा. त्या शिवाय त्यांची चूलच पेटणार नाही. कारण, शाळेकडून मिळाऱ्या २-३ हजार मानधनात थोडंच भागणार आहे? असं हे रहाटगाडगं गेल्या अठरा वर्षांपासून सुरू आहे. केवळ एकाच आशेवर एक दिवस केलेलं कष्ट सार्थकी लागेल. कधीतरी आपण पूर्ण पगार घेऊ ही आशा ठेऊन नुसतं झटत राहायचं. 

१८ वर्षांची नोकरी करून जून २०१८ मध्ये निवृत्त होणार. परंतु, हा आशावाद काय संपला नाही. अनेक पिढ्या घडविण्यासाठी झटून स्‍वत:च्या पोरांना शिकवण्याची मात्र ऐपत नाही. कित्येक वर्ष काम करून जगण्याइतपतही पैसा मिळाला नाही. मिळतोय तो फक्त शिक्षण प्रक्रियेत काम करण्याचा आनंद. पण केवळ आनंदानं पोट नाही ना भरत. 

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वढे-पाचगणी पठाराचा प्रदेश आहे. या दुर्गम भागात एका टेकडीवर श्री कमला माधव विद्यामंदिर ही शाळा आहे. वाड्या-वस्‍तीवरील, धनगर वाड्यांतील पोरांना आणून इथं शिकवलं जातं. तेही पूर्णपणे मोफत. शाळा गुणवत्तेच्या दृष्टीने चांगली. विविध उपक्रमांत राज्यस्तरीय पुरस्कारही शाळेने घेतले. मात्र, सरकारकडून अनुदानरुपी पुरस्कार शाळेला स्थापनेच्या अठरा वर्षानंतरही मिळाला नाही. 

शाळेची स्थापना २००० सालची. तेव्हापासून भीमराव सुतार हे शाळेत शिपाई म्हणून काम करत आहेत. परंतु, शाळेला अनुदान नसल्याने संस्था देते त्या मानधनावर भागत नसल्याने उर्वरित वेळेत दुसरे काम करून त्यांना प्रपंच चालवावा लागतो. ही व्यथा एकट्याची नाही. त्या शाळेत काम करणाऱ्या सगळ्याच कर्मचाऱ्यांची हीच अवस्था आहे. 

राज्यात ठिकठिकाणी शिक्षणाचा बाजार मांडला जात असताना आणि शिक्षण पैसे कमवायचं साधन बनलेलं असताना, या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत ज्ञान दानाचं कार्य सुरू आहे. संस्‍था आणि संस्‍थेचे कर्मचारी निष्‍ठेने हे काम करत आहेत. त्यात वेतन नावाचा प्रकार काय तो जगण्यापुरताही नाही. तरीही कामात कसूर नाही. वाड्यावस्‍त्यांवरील पोरांना गोळा करून शिक्षण एखाद्या इंटरनॅशनल स्‍कूललाही लाजवेल अशा प्रकारचं दिलं जातं. त्यामुळेच इथल्या पोरांनी मोठी मजल मारली. पोरं शिकून मोठी झाली, परंतु येथील शिक्षक आणि कर्मचारी बिन पगारी त्याच ठिकाणी सरकार दरबारी न्याय मिळेल या प्रतिक्षेत कायम आहेत. 

शाळेतील दुसरे एक कर्मचारी विलास बाबुराव कांबळे हेही या शाळेत १७-१८ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचीही स्थिती वेगळी नाही. शाळेत शिपाई, बागकाम, तबला वादनाचेही काम ते करतात. परंतु, तुटपुंज्या वेतनात कुटूंबाचा भार वाहणं शक्य होत नाही. त्यासाठी मिळेल त्या वेळेत दुसरं काम करावं लागतं, असं त्यांनी सांगितलं. 

चार वर्षांपूर्वी शाळेला २० टक्के अनुदान मिळाले. त्यामुळे ४ हजार रुपये पगार मिळतो. तोही ५-६ महिन्यांपासून मिळाला नाही. अशी आपली व्यथा मांडताना विलास कांबळे यांच्या डोळ्यातून पाणी आलं. सरकारने उपकार करावेत आणि आम्हा्ला न्याय द्यावा, असे कांबळे म्हणाले. 

विष्णू कदम हे येथे शिक्षक म्हणून काम करतात. शाळेत पूर्णवेळ काम करूनही योग्य मोबदला मिळत नाही. शाळेजवळच असणाऱ्या एका खोलीत ते मुक्कामी असतात. कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने कुटूंब गावाकडे ठेऊन शाळेत राहतो. १६ वर्षे झाली मिळेल त्या मानधनावर केवळ आशेवर काम करतोय, असे ते म्हणाले. 

शाळेत विद्यार्थी नाहीत म्हणून सरकार शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. परंतु, राज्यात अशा अनेक शाळा आहेत. ज्या कित्येक वर्षे सरकारच्या कोणत्याही अनुदानाशिवाय शिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत. अनुदान नसल्याने शिक्षक विनामोबदला १५-१५ वर्षे राबत आहेत. परंतु, सरकारचे अशा शाळांकडे दुर्लक्षच आहे. कित्येक शाळांत विषय शिक्षकही नाहीत. नोकर भरतीचं भिजत घोंगडं कायम आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेशतल्या समस्या गंभीर बनत आहेत. सरकारने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

 

Tags : School, Sangli, subsidy, Salary