Sat, Mar 23, 2019 12:35होमपेज › Sangli › मंदिरे-समाजमंदिरात भरतात ९५ अंगणवाड्या 

मंदिरे-समाजमंदिरात भरतात ९५ अंगणवाड्या 

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 10:20PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : मारूती पाटील

शिक्षण व संस्कार देणार्‍या अंगणवाड्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.  त्याचवेळी सधन व समृध्द वाळवा तालुक्यात तब्बल 95 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या समाज मंदिरे, मंदिरे  किंवा खासगी जागेत भरत आहेत. 

वाळवा तालुक्यात 381 मोठ्या  आणि 10 छोट्या अशा 391 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 296 अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत. मात्र 95 अंगणवाड्यांना इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना स्वत:ची इमारत उभारता आलेली नाही. अंगणवाड्यांना जागा देण्यासाठी संबंधित गावातील कोणी दानशूर व्यक्तीही पुढे येताना दिसत नाही. 

स्वत:ची इमारत नसल्याने 36  देवळात, 30 प्राथमिक शाळेत, 14  ग्रामपंचायतीच्या इमारतीत आणि 13 अंगणवाड्या समाज मंदिरात भरत आहेत. या अंगणवाड्यांसाठी एक गुंठा जागा उपलब्ध होऊन स्वत:ची इमारत उभी रहावी यासाठी वाळवा पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधी व संबंधित गावातील लोकांनीही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी एकीकडे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र जिथे संस्काराचे व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी चिमुकल्यांना हक्काची जागा नाही तिथे हे उपक्रम कसे राबवायचे, असाही प्रश्‍न अंगणवाडी सेविकांसमोर आहे. 

तालुक्यातील 391 पैकी 71 अंगणवाड्या आयएसओ मानांकित झाल्या आहेत. 200 अंगणवाड्या आयएसओ मानांकनासाठी सज्ज झाल्या आहेत. आदर्श अंगणवाडी योजनेअंतर्गतही सर्वच अंगणवाड्यांची लवकरच तपासणी केली जाणार असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी सुहास बुधवले यांनी सांगितले.